Sangvi : पिंपळे गुरव येथून 11 लाखांची विदेशी दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथून राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तब्बल 11 लाख 39 हजार 500 रुपये किंमतीचे विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आली आहे.

नागा डाया चावडा (वय 35, रा. पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध बनावट स्कॉचची वाहतूक आणि विक्री होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे सापळा रचून चावडा याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असणाऱ्या दुचाकीची झडती घेतली असता त्यामध्ये 1 लीटर क्षमतेच्या दोन सिलबंद बॉटल मिळाल्या. या बनावट असल्याचा संशय पथकाला आला. त्यावरून त्याच्याकडे चौकशी केली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यानुसार अधिक तपास केला असता त्याने रिकाम्या बॉटलमध्ये बनावट स्कॉच भरून त्या विकत असल्याचे सांगितले.

  • या कारवाईत पोलिसांनी विविध ब्रॅन्डच्या एक लिटर क्षमतेच्या 67 भरलेल्या बाटल्या तसेच 500 रिकाम्या बाटल्या, 2 हजार बुचे, 260 लेबल, 950 कव्हर, असा एकूण 11 लाख 39 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक अवैध दारु वाहतूक आणि विक्री यांच्यावर धडक कारवाई करत आहे. याचा पुढील तपास एस. आर. दाबेराव करीत आहेत.

ही कारवाई मुख्य निरीक्षक ए. बी. पवार, उपनिरीक्षक एस. आर. दाबेराव, सचिन भवंड, दत्ता गवारी, जवान स्वप्नील दरेकर, महेंद्र कदम, प्रिया चंदनशीवे, शशांक झिंगळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.