Sangvi : रुग्णाच्या नातेवाईकांकडून रिसेप्शनिस्टसह डॉक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज – डॉक्टर दवाखान्यात नियोजित वेळेपूर्वी पोहोचले. याचा पेशंटना फायदा होईल, या उद्देशाने रुग्णालयातील रिसेप्शनिस्टने अपॉइंटमेंट घेतलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना फोन केला. वेळेपूर्वी डॉक्टर आले आहेत. आता तुम्ही येऊ शकता म्हणणा-या रिसेप्शनिस्टला नातेवाईकाने फोनवर शिवीगाळ करून रुग्णालयात येऊन मारहाण केली. तसेच डॉक्टरांना आणि त्यांच्या वडिलांना देखील मारहाण केली. हा प्रकार शिवगणेश चौक पिंपळे गुरव येथे मंगळवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घडला.

डॉक्टर योगेश सुभाष मुथ्थ्या (वय 31, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सय्यद हाजी शेख (वय 28) आणि अमजद बादल (वय 33, दोघे रा. पिंपळे गुरव) या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक चैत्राली गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद याच्या मुलीचे दात दुखत होते. त्यामुळे त्याने पिंपळे गुरवमधील शिवगणेश चौकात असलेल्या लहान मुलांच्या दातांच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. मंगळवारी रात्रीची अपॉइंटमेंट घेतली होती. सायंकाळी डॉक्टर योगेश दवाखान्यात नियोजित वेळेपेक्षा लवकर आले. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणा-या तरुणीने सय्यद यांना फोन केला.

‘डॉक्टर लवकर आले आहेत. तुम्ही तुमच्या वेळेपूर्वी आलात तरी चालेल’ असे रिसेप्शनिस्टने सय्यद यांना सांगितले. पण, काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या सय्यदने रिसेप्शनिस्टला फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. काही वेळानंतर सय्यद आणि अमजद दोघेजण रुग्णालयात आले. त्यांनी कुणाचे काहीही ऐकून न घेता रिसेप्शनिस्टला मारहाण केली. तसेच बेकायदेशीरपणे डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन डॉक्टर योगेश आणि त्यांच्या वडिलांना देखील मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.