Sangvi : पवनाथडी जत्रेला सुरुवात; चित्रा वाघ यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – महिला बचत गटाने उत्पादित (Sangvi) केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर आजपासून आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेला सुरुवात झाली. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. आजपासून 15 जानेवारी 2024 पर्यंत पवनाथडी जत्रा असणार आहे.

महिला बचत गट आणि वैयक्तिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी पवनाथडी जत्रा प्रभावी माध्यम ठरले आहे. यामध्ये महिला बचत गटांसाठी विक्री प्रदर्शनासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतात. यावर्षी देखील सोडत पद्धतीने स्टॉल्सचे वाटप करण्यात आले आहे. यंदा दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

जत्रेच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध भागातील पारंपरिक लोककलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळींची जुगलबंदी, महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक लोककलांचे सादरीकरण लोककलाकार याठिकाणी सादर करतील. लहान मुलांना विविध आकर्षक व मनोरंजक खेळ खेळण्याची व अनुभवण्याची संधी जत्रेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना विविध खाद्यसंस्कृतीच्या आस्वादासह मनोरंजनाचीही मेजवानी मिळणार आहे.

Pimpri : विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आंदोलकांवर गुन्हा दाखल

पवनाथडी जत्रेमध्ये दररोज सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक (Sangvi) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज मराठमोळी संस्कृती जतन करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची लोकधारा’ झाला. उद्या 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ‘म्युझिक मेकर्स’ हा सुमधूर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर होईल तर 7.30 वाजता ‘खेळ रंगला पैठणीचा- होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम सादर होईल. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता किशोरकुमार, आर. डी. बर्मन आणि बप्पी लहिरी यांच्या गाण्यांचा ‘सुपरहिट्स ऑफ बॉलिवूड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ‘लावणी महोत्सव’ हा लावणी सम्राज्ञींचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच पवनाथडीच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मराठी- हिंदी गीतांचा नजराणा ‘कारवाँ गीतोंका’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पवनाथडी जत्रेच्या निमित्ताने विविध शहरातून तसेच महापालिकांमधून समित्या, अनेक मान्यवर जत्रेस भेट देत असतात. तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, राजकीय नेतेमंडळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील जत्रेत सहभागी होतात. सलग पाच दिवस चालणाऱ्या जत्रेमध्ये सुमारे तीन ते पाच लाख लोक भेट देतील असा अंदाज आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या नागरीकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध केल्याचे समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.