Sangvi : व्हिडिओमधून मध्यमवर्गाची व्यथा मांडणाऱ्या महिलेला पोलिसांकडून मदत आणि नोटीसही 

एमपीसी न्यूज – मध्यमवर्गीयांच्या समस्येला पिंपळे गुरवमधील एका महिलेने वाचा फोडत व्हिडिओच्या माध्यमातून खासदार, आमदार आणि नगरसेवकांना जाब विचारला. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. सांगवी पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढत तिला मदत मिळवून दिली. त्याच बरोबर सोशल मीडियावरील व्हिडिओबाबत तिला कायदेशीर नोटीसही बजावली.

पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या एका महिलेने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये तिने मध्यमवर्गाची व्यथा मांडली. सोबतच निवडणुकीच्या वेळी मते मागण्यासाठी येणाऱ्या परंतु अडचणीच्या काळात कोणतीच मदत न करणाऱ्या स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार सर्वांवरच सडकून टीका देखील केली.

निवडणुकीच्या काळात सर्वच राजकीय पक्षांचे नेते मत मागण्यासाठी आमच्या दारापर्यंत येतात. कार्यकर्ते गोळा करून प्रचार करतात. आता या कार्यकर्त्यांना खरी मदतीची आवश्‍यकता असताना खासदार, आमदार आणि नगरसेवक घरात बसले आहेत. पुढच्यावेळी आमच्या दारात आणि गल्लीतही मत मागायला येऊ नका, असा थेट इशारा त्या महिलेने व्हिडिओद्वारे दिला. त्या महिलेने केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारल्याने त्या महिलेचे कौतुकही होत आहे.

त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांनी याची दखल घेतली. सांगवी पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढले. तिला आवश्‍यक असलेले रेशन मिळवून दिले. परंतु सोबतच तो व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबाबत तिला नोटीसही बजावली.

का बजावली त्या महिलेला नोटीस?

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले, “लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व्हिडिओमधील महिलेला रेशनवरील धान्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र तिने नागरिकांना भडकविणारे आणखी काही व्हिडिओ तयार करू नये, म्हणून त्या महिलेला नोटीस बजावली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.