Sangvi : सांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या; आमदार जगताप यांची आरोग्यमंत्री दिपक सांवत यांच्याकडे मागणी

 एमपीसी न्यूज – औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील क्षयरोग रुग्णालयाच्या मालकीची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या गोडाऊनची जागा सांगवी पोलिस ठाण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच रुग्णालयाच्या आवारात दुरवस्थेत असलेल्या पाण्याच्या टाकीची २० गुंठे जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतर करावी. या जागेत महापालिकेकडून पाण्याची नवीन टाकी बांधून रुग्णालयालाही पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल.

 

त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारात असलेल्या निवासस्थानात अनधिकृतपणे राहत असणाऱ्यांना बाहेर काढून त्याचा योग्य वापर करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याकडे शनिवारी (दि. ८) केली. या सर्व मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री सावंत यांनी दिले.

 

औंध जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय वसतिगृह आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री सावंत यांना सोबत घेऊन रुग्णालयाच्या परिसरात दुरवस्थेत असलेल्या पाण्याची टाकी दाखवली. तसेच निवासस्थान आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या गोडाऊनची जागाही दाखवली. यासंदर्भात आमदार जगताप यांनी आरोग्यमंत्री सावंत यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला होता. तसेच अधिवेशनातही या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर आरोग्यमंत्री सावंत यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून त्यावर अधिक चर्चा करण्याचे आश्वासन आमदार जगताप यांना दिले होते.

 

त्यानुसार आरोग्यमंत्री सावंत हे शनिवारी औंध जिल्हा रुग्णालयात आले असता आमदार जगताप यांनी त्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष जागेवर नेत सर्व माहिती दिली. औंध जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या जागेतील गोडाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या गोडाऊनच्या परिसरात झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण वाढत चालले आहे. तसेच या जागेत अनधिकृत टपऱ्या व दुकाने थाटण्यात आली आहेत. ही जागा सांगवी पोलिस ठाण्यासाठी दिल्यास कायदा सुव्यवस्थेसाठी सोयीचे ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनीही तशी अनेकदा मागणी केली आहे. त्यामुळे ही जागा सांगवी पोलिस ठाण्यासाठी तातडीने देण्यात यावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली.

 

 आमदार जगताप यांनी या रुग्णालयाच्या परिसरात ४० वर्षापूर्वी बांधलेली पाण्याची टाकी आरोग्यमंत्र्यांना दाखवली. या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली असून, ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची वाट न पाहता या पाण्याच्या टाकीची २० गुंठे जागा महापालिकेला हस्तांतर करावी. त्या जागेत महापालिकेकडून पाण्याची नवीन टाकी उभारण्यात येईल आणि रुग्णालयालाही याच टाकीतून पिण्याचा पाणीपुरवठा केला जाईल, असे आमदार जगताप यांनी आरोग्यमंत्र्यांना सांगितले.
तसेच रुग्णालयाच्या आवारातील शासकीय निवासस्थानात अनेकजण अनधिकृतपणे राहत असल्याकडेही आमदार जगताप यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यातून या निवासस्थानात खुनासारख्या घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. याठिकाणी अनधिकृतपणे राहत असणाऱ्यांची चौकशी करून त्याचा योग्य वापर करण्याची मागणीही त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. आमदार जगताप यांनी केलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री सावंत यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.