Sangvi : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतली सांगवीतील पीडित कुटुंबीयांची भेट

एमपीसी न्यूज – सांगवी येथे कामगार वसाहतीत राहणा-या कामगारांच्या अडीच वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिचा खून केला. विमेन हेल्पलाईन, पिंपरी-चिंचवड यांच्या पाठपुराव्यातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगवी येथील या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत पोलिसांना या घटनेचा लवकरात लवकर तपास करण्याबाबत सांगितले.

सांगवी परिसरात पीडित बांधकाम कामगार कुटुंब राहते. पत्र्याचा आडोसा केलेल्या खोलीवजा घरात हे कुटुंब राहत आहे. नवरा-बायको आणि अडीच वर्षाची चिमुकली असे हे कुटुंब होते. मंगळवारी (दि. 23) पहाटे अज्ञात आरोपींनी अर्धवट उघड्या असलेल्या या घरात प्रवेश केला. अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले. आरोपींनी तिच्याशी अमानुषपणे अत्याचार केले. तसेच तिचा गळा आवळून ठार मारले. ठार मारलेल्या चिमुकलीचा मृतदेह आरोपींनी सांगवी येथील मिलिटरीच्या परिसरात पाण्याने भरलेल्या नाल्यात टाकून दिला.

  • मंगळवारी सकाळी चिमुकली घरात नसल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. त्यांनी सर्वत्र तिचा शोध घेतला मात्र, ती मिळून आली नाही. पालकांनी तात्काळ सांगवी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांच्या पथकाने मुलीचा शोध सुरु केला असता सांगवी येथील मिलिटरीच्या परिसरात मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका नाल्यामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून गळा आवळून ठार मारल्याचे समोर आले.

महापालिका आणि राज्य महिला आयोग यांच्या वतीने प्रज्वला महिला बचत गटाचा एक कार्यक्रम आज (बुधवारी) शहरात होता. त्या कार्यक्रमासाठी आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगवी येथील पीडित कुटुंबाला भेट दिली.

  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा एखाद्या शहरात कार्यक्रमानिमित्त जातात आणि त्याच दिवशी असा मन सुन्न करणारा प्रकार त्या शहरात घडतो, हे दुर्दैव आहे. अशा प्रकारची नाराजी रहाटकर यांनी व्यक्त केली. पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांना दिलासा दिला. घटनेतील आरोपींना तात्काळ पकडण्याचे आदेश पोलिसांना दिले. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. पीडित कुटुंबाला मदत आणि सुरक्षा देण्याचेही निर्देश रहाटकर यांनी दिले.

विमेन हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना निवेदन दिले. शहरात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. शहरातील महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत. लहान मुलींसह महिलांवर होणारे अत्याचार थांबायला हवे, असे नीता परदेशी यांनी रहाटकर यांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.