Sangvi : घरफोडी, वाहनचोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला अटक; पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 14 गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – दिवसा मोटारसायकल फिरून बैठ्या बंद घराची पाहणी करायची आणि रात्रीच्या वेळी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणा-या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. त्याच्याकडून 15 लाख 13 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड मधील तीन तर पुणे शहरातील 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.

रफिक हुसेन शेख (वय 26, रा. ससाणे नगर, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस रेकोर्डवरील आरोपींची माहिती काढून त्यांचा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करत असताना आरोपी शेख याने सांगवी आणि वाकड परिसरात मागील काही दिवसांपूर्वी घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, पोलिसांनी सांगवी परिसरात सापळा रचून शेख याला अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता त्याने मागील आठ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात 12 ठिकाणी घरफोडी तर दोन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी त्याच्याकडून 367 ग्राम सोन्याचे दागिने, 279 ग्राम चांदीचे दागिने, दोन मोटारसायकल असा एकूण 15 लाख 13 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी व वाहनचोरीचे 24 गुन्हे दाखल आहेत. आरोपी दुपारच्या वेळी दुचाकीवरून शहरात फिरून बंद असलेल्या बैठ्या घरांची पाहणी करीत असे. त्यानंतर रात्रीच्या वेळी सायकलच्या स्टॅंडच्या सहाय्याने कडी-कोयंडा तोडून घरफोडी करत असे.

या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी पोलीस ठाण्यातील एक, वाकड पोलीस ठाण्यातील दोन असे तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सहा, हडपसर तीन, सिंहगड आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, संजय गवारे, नारायण जाधव, प्रवीण दळे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, शावरसिद्ध पांढरे, लक्ष्मण आढारी, गौस नदाफ, तुषार शेटे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, गोविंद चव्हाण, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.