Sangvi : मालकाच्या घरी चोरी करणाऱ्या नोकरास अटक; नऊ लाखांचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज – स्वयंपाकी व साफसफाईचे काम करत असलेल्या नोकराने मालकाच्या घरात चोरी करत नऊ लाख 17 हजार रुपयांचे दागिने चोरले. या चोरट्याला अवघ्या 12 तासात सांगवी पोलिसांनी अटक करून सर्व दागिने जप्त केले आहेत.

नामदेव विठ्ठल चव्हाण (रा. पिंपळे निलख गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला जयंती वासुदेवन अय्यंगार यांच्या घरी मागील तीन वर्षांपासून आरोपी नामदेव कुक आणि झाडू पोचा मारण्याचे काम करत होता. त्याने 10 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत घरातील लाकडी कपाटातून सोने, हि-याचे दागिने, सोन्याचे कॉइन असा एकूण नऊ लाख 17 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना सांगवी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी नामदेव याला पिंपळे निलख परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्यासमोर त्याचे बिंग टिकू शकले नाही. त्याने चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे दत्तात्रय गुळींग, यशवंत साळुंखे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, रोहिदास बोहाडे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, नितीन दांगडे, अरुण नरळे, नितीन खोपकर, शशिकांत देवकांत, विनायक देवकर, हेमंत गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like