Sangvi : ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलणा-यांवर कारवाई करा

नवी सांगवी येथील स्थानिक नागरिकांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – नवी सांगवीमध्ये संरक्षण विभागाच्या जागेतून येणारे पावसाचे पाणी एका ओढ्याद्वारे पवना नदीत सोडण्यात आले आहे. त्या ओढ्याला नैसर्गिक प्रवाह आहे. त्याचा नैसर्गिक प्रवाह मातोश्री वरद विनायक व्हेंचर यांनी बदलला असून ओढ्याची रुंदी देखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

स्थानिक नागरिक पुरुषोत्तम ढोरे, अशोक ढोरे, खंडु ठाकूर, बी. आर. गरुड यांनी याप्रकरणी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, “नवी सांगवी परिसरातून एक ओढा वाहतो. त्या ओढ्याचे पाणी नैसर्गिक प्रवाहानुसार पवना नदीत सोडण्यात आले आहे. २००९ सालच्या सुमारास संरक्षण विभागाने त्यावर बंधारा बांधला. त्या बंधा-याचा सांडवा एका ओढ्याद्वारे पवना नदीत सोडण्यात आला. हा ओढा साई चौक, फेमस चौक, इंद्रप्रस्थ रस्ता या भागातून जातो. तो ओढा मातोश्री वरद विनायक व्हेंन्चर यांच्याकडून अडवण्यात आला आहे.

  • यामुळे ओढ्याची रुंदी कमी झाली आहे. ओढ्याचे पात्र कमी करुन बंदिस्त केला असल्याने बाधीत रहिवाशांचे कधीही न भरुन येणारे नुकसान होणार आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. यातून अनेक साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

​याबाबतीत मातोश्री वरद विनायक व्हेंनचरचे राहुल गोडसे म्हणाले की ढोरे कुटुंबीय व त्यांचे चुलत बंधू यांच्यात आपापसात वाद आहे. रहिवाशांनी कोणताही नजराणा भरलेला नाही.तो मुळात ओढा नव्हता. शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ढोरे करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like