Sangvi : पिंपरी-चिंचवडकरांचा औंधमार्गे पुण्याशी संपर्क तुटला! संततधार पावसाचा फटका

सांगवी परिसरातील मुळा नदीवरील तीन पूल वाहतुकीसाठी बंद; पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरातील मुळा नदीवरील जुना औंध पूल, राजीव गांधी पूल, स्पायर कॉलेज रोडवरील पूल हे तीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोणत्याही पुलावर पाणी आले नसून फुलाच्या आजूबाजूला पूरसदृश परिस्थिती असल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. औंध-रावेत बीआरटी मार्गावर मुळा नदीवर असलेला पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने पिंपरी-चिंचवडकरांचा औंध मार्गे पुण्याशी संपर्क तुटला आहे.

औंध ‘डी मार्ट’कडून औंध-रावेत बीआरटी मार्गाकडे जाणा-या रस्त्यावरील जुना औंध पूल, औंध मधील राजीव गांधी पूल, स्पायर कॉलेज रोडवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ असलेला पूल; हे तीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग अथवा निगडी-दापोडी जुना पुणे-मुंबई महामार्ग या दोन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • सांगवी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी भागातील तीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यातील कोणत्याही पुलावर पाणी आले नसून पुलाच्या आजूबाजूला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुळा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. मुळा नदीचे पाणी सांगवी परिसरात शिरल्याने सर्व रस्ते जलमय झाले आहेत. घरात सोसायट्यांमध्ये पाणी झाले आहे. अति महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे. दरम्यान हिंजवडी वाकड आणि सांगवी भागातील काही आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे.

  • हिंजवडी, वाकड, पिंपरी-चिंचवड मधील अनेक कंपन्यांनी कामगारांना लवकर सोडले. औंधमार्गे पुणेकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर ताण येणार आहे. पुण्यातून पिंपरी-चिंचवडकडे आणि पिंपरी-चिंचवडकडून पुण्याकडे जाणा-यांचे हाल होण्याची शक्यता आहे. पुण्याकडे जाणाऱ्या  नागरिकांनी पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.