Sangvi : महादेव मंदिराचा सभामंडप कोसळून तिघांचा मृत्यू; नऊ जखमी

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ महादेव मंदिराचा सभामंडप काम सुरु असताना कोसळला. ही घटना आज (बुधवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली. यामध्ये 12 कामगार अडकले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून नऊजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
मंतोष दास (वय 29, रा. पिंपळे निलख. मूळ रा. पश्चिम बंगाल), चिदम्मा मनसोप्पा पुजारी (वय 30, रा. खडकी, पुणे), प्रेमचंद शिबू राजवार (वय 35, रा. लेबर कॅम्प, सांगवी. बारजापूर नदिया, पश्चिम बंगाल) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, कमलेश कांबळे (वय 17, रा. विशाल नगर, पिंपळे निलख), आयप्पा मलप्पा तुंबडू (वय 35, रा. विशाल नगर), सेवा साहू (वय 30, मूळ रा. बिहार), धनंजय चंदू धोत्रे (वय 24, रा. मूळ रा. बीड), योगेश मच्छिन्द्र मासळकर (वय 20, रा. श्रीगोंदा), मलम्मा शरणाप्पा पुजारी, नीलिमा शरणाप्पा पुजारी, कृष्णा पवार, शमोन सरदार अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- याबाबत अधिक माहिती अशी, पिंपळे गुरव गावठाण येथील स्मशानभूमीजवळ महादेव मंदिर असून याचे दीड महिन्यापासून जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. मुख्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर मंदिरासमोरच्या सभामंडपाचे काम सुरु होते. या मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम आहे. सभामंडपाचे काम सुरु आहे.
मूळ ठेकेदाराचे दोन कामगार आज सुट्टीवर असल्याने त्याने दुस-या ठेकेदाराकडून दोन बदली कामगार बोलावले होते. काम सुरु असताना दुपारी तीनच्या सुमारास मंदिराच्या सभामंडपाच्या भिंती कोसळल्या. काही क्षणात संपूर्ण सभामंडप जमीनदोस्त झाला. यामध्ये एकूण 12 कामगार अडकले. सर्व कामगार यामध्ये गंभीर जखमी झाले.
- त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तीन कामगारांचा मृत्यू झाला. अन्य नऊ जणांवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.



