Sangvi :’त्या’ तरुणाची बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या?;  मृतदेहाची ओळख पटली

एमपीसी न्यूज – पवना नदीत सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या रहाटणी उपविभागाचे जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. या तरुणाची ओळख पटली असून त्याने नोकरी नसल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शुभम सुंदर चांदणे (रा. सुसगाव) असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या रहाटणी उपविभागाला माहिती मिळाली की, पवना नदीमध्ये सांगवी येथे एक मृतदेह पाण्यावर तरंगत आहे. त्यानुसार, फायरमन मनोज मोरे, विलास पाटील, विशाल पोटे यांना घेऊन वाहनचालक अमोल रांजणी यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. एक तासाच्या अथक परिश्रमानंतर जवानांनी तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.

मयत शुभम याला नोकरी नसल्याने तो नैराश्यात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून त्याचा मृतदेह पाण्यात असल्याचा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.