Sangvi : दोन पादचारी महिलांची मंगळसूत्र हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना सोमवारी (दि. 16) सायंकाळी पिंपळे गुरव येथे घडली.

शुभांगी मयूर भावसार (वय 33, रा. महाराष्ट्र कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी भावसार या रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्या जवळकर नगर येथील मोर मॉलच्या समोर आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

तसेच याच आरोपींनी ज्योती बडे (रा. पिंपळे सौदागर) यांच्याही गळ्यातील 33 ग्रॅम वजनाचे 62 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.