Sangvi : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून तरुणाने महिलेला ब्लॉक फेकून मारला. यामध्ये महिला जखमी झाली. तसेच तरुणाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. याबाबा तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागरमधील रोझ व्हॅली सोसायटी येथे घडली.

मनकरणा अशोक पवार (वय 40, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रदीप सुभाष जाधव (वय 25, रा. वडगाव फाटा, वडगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांनी आरोपी प्रदीप याच्या विरोधात डिसेंबर 2018 मध्ये वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग मनात धरून प्रदीप याने पवार यांना शिवीगाळ करत ‘तू माझ्यावर गुन्हा दाखल केला ना, आता मी तुला सोडत नाही’ असे म्हणून ब्लॉक फेकून मारला.

ब्लॉक पायावर लागल्याने पवार खाली पडल्या असता आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 41 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण याचा पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.