Sangvi : महागड्या सायकली चोरणारे तीन वेटर्सना अटकेत; 22 सायकल जप्त; सांगवी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये वेटर आणि कुक म्हणून काम करणा-या तिघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 22 महागड्या सायकल जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील चार, चिंचवड आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

राजा सुशील रॉय (वय 20, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. पश्चिम बंगाल), मंतोष माधव सरकार (वय 26, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. पश्चिम बंगाल), सजल मंतु बिसवास (वय 26, रा. निगडी. मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सांगवी पोलीस 12 सप्टेंबर रोजी पिंपळे सौदागर परिसरात गस्त घालत होते. पिंपळे सौदागर येथील आयसीआयसीआय बँकेसमोर आले असता राजा रॉय हा तरुण सायकलवरून संशयितरित्या जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याकडे चौकशी केली. राजा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला पोलिसांनी सांगवी पोलीस ठाण्यात आणून पोलीसी खाक्या दाखवला असता त्याच्याकडे असलेली सायकल चोरीची असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी पक्कड, कटर सापडला.

राजाने ती सायकल त्याच्या मंतोष आणि सजल या दोन मित्रांसोबत मिळून काटे पुरम चौक येथून चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी मंतोष आणि सजल या दोघांना देखील ताब्यात घेतले. तिघांनी मिळून 22 सायकल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी राजा आणि सजल हे दोघे पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलमध्ये वेटर तर आरोपी मंतोष हा कुक म्हणून काम करतो.

सांगवी पोलिसांनी तिघांकडून 1 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 22 सायकल जप्त केल्या. या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील चार, चिंचवड आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, यशवंत साळुंखे, पोलीस कर्मचारी कैलास केंगले, सुरेश भोजणे, चंद्रकांत भिसे, नितीन दांडगे, शशिकांत देवकांत, दीपक पिसे, अनिल देवकर, नितीन खोपकर, विनायक देवकर, हेमंत गुत्तीकोंडा यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.