Sangvi : पाणी येत नसल्याची तक्रार केल्यावरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये कमी पाणी आले, याची तक्रार एका नागरिकाने नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन केली. याचा राग मनात धरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार नागरिकाच्या घरी जाऊन संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडला.

संतोष दोडके (वय 43, रा. धीरज गोल्ड अपार्टमेंट, पिंपळे निलख, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल कामटे, विशाल कामटे, प्रतीक दळवी, गणेश (पूर्ण नाव माहिती नाही) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडके यांच्या सोसायटीमध्ये गुरुवारी पाणी कमी आले. याची तक्रार घेऊन ते नगरसेवक तुषार कामठे यांच्या विनायकनगर पिंपळे निलख येथील जनसंपर्क कार्यालयात गेले. त्यांनी आपली तक्रार अमोल कामठे याच्याकडे तोंडी केली. रात्री साडेआठच्या सुमारास दोडके घरी जेवण करत होते, त्यावेळी तुषार कामठे यांचा ड्रायवर गणेश याने दोडके यांना सोसायटीच्या पार्किंग परिसरात बोलावले.

पार्किंग परिसरात अमोल, विशाल, प्रतीक आणि त्यांचे काही साथीदार होते. ‘तुम्ही दरवेळेस पाण्यासाठी ऑफिसमध्ये येऊन तक्रारी का करता’ असे म्हणत सर्वांनी मिळून संतोष दोडके, त्यांचा मुलगा प्राणिकेत (वय 19) याला देखील मारहाण केली. तसेच दोडके यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली. सर्वांनी प्राणिकेत याला तीन ते चार दिवसात ठार मारण्याची धमकी दिली. यावरून दोडके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, वैयक्तिक कारणावरून ही भांडणे झाली असून त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. ही भांडणे माझ्या कार्यालयात झालेली नसून इमारतीमध्ये झाली आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करावेत. भांडण केलेले आपल्या कार्यालयातील कर्मचारी नाहीत असे स्पष्टीकरण तुषार कामठे यांनी दिले आहे. पोलीस पैशांसाठी काहीही करत असल्याचा आरोपही कामठे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.