Sangvi : सांगवीतून दोन दुचाकी, देहूरोडमधून रिक्षा तर निगडीमधून कारचे टायर चोरीला

चोरट्यांनी एकूण दोन लाख 18 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरातून दोन दुचाकी तर देहूरोड परिसरातून एक तीनचाकी रिक्षा चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. तसेच निगडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी कारचे टायर रिमसह चोरून नेले आहे. याबाबत मंगळवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी एकूण दोन लाख 18 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

सांगवी पोलीस ठाण्यात नानासाहेब लिंबराज गोमासे (वय 34, रा. पिंपळे निलख. मूळ रा. वाकडी, ता. परांडा. जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोमासे यांनी त्यांची 95 हजार रुपये किमतीची बुलेट (एम एच 25 / ए पी 6720) 26 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता पिंपळे निलख येथील घरी पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 27 जुलै रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.

सांगवी पोलीस ठाण्यात आणखी एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शैलेश दामोदर मोरे (वय 41, रा. पिंपळे गुरव) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे यांचे विनायक नगर, पिंपळे गुरव येथे गीतांजली व्हरायटीज नावाचे दुकान आहे. 26 जुलै रोजी रात्री सात वाजता मोरे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ई व्ही 2686 दुचाकी दुकानासमोर पार्क केली. दुकानाच्या समोरून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेली. 27 जुलै रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

बाबू लक्ष्मण नायडू (वय 40, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात त्यांची तीनचाकी रिक्षा चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नायडू हे रिक्षा चालक आहेत. रिक्षा चालवून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. 27 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची एम एच 14 / एच एम 7119 ही रिक्षा विकासनगर येथील घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली आहे. हा प्रकार 28 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

सुनीत गोपीनाथ चेट्टी (वय 43, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात त्यांच्या कारचे टायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेट्टी यांच्याकडे वेगन आर (एम एच 14 / 3986) ही कार आहे. त्यांनी त्यांची कार घराच्या समोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचे टायर खोलून रिमसह चोरून नेले आहे. हा प्रकार 28 जुलै रोजी पहाटे साडेबारा ते सकाळी साडेसह वाजताच्या सुमारास घडला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.