Sangvi : ज्येष्ठ न होता तरुणांप्रमाणे उर्मीने काम करा – भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज – संघर्षमय जीवनातून पुढे आल्यानंतर मनाने ज्येष्ठ नागरिक न होता, उर्मीने काम करा. समाजातील बेताल गोष्टींना ज्येष्ठ नागरिकच वैचारिकतेतून आवर घालू शकतात, असे मत नाट्य परिषेदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले.

जुनी सांगवीतील पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भोईर बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, संघाचे अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी, अशोक चव्हाण, प्रकाश देशमुख, सुदामराव बोंबले, बबनराव शितोळे, संभाजी मनोकर, रमेश राणे, शैला लोंढे, जनार्दन सावंत, उमेश पाठक, गोपीनाथ लोंढे, निर्मला वाघमारे, महेश भागवत, मीना शितोळे, भटू शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी संघाच्या अहवालाचे प्रकाशन विलास लांडे आणि भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमही घेण्यात आले. कृष्णाई महिला भजनी मंडळाने भजनांचा कार्यक्रम सादर केला. तसेच लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान विषयावर मूकनाट्य सादर करीत स्वच्छतेविषयी जनजागृती केली. ज्येष्ठ महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांही यावेळी घेण्यात आल्या.

भोईर पुढे म्हणाले, ” कुठे भ्रष्टाचार होत असेल, ज्येष्ठांनी सडेतोड भूमिका घ्यावी. तरुणांवर रागावण्याचा त्यांना अधिकार आहे. मनातील उर्मी, शक्ती, दिनचर्येची सुरुवात, संगत, संतती, संपत्ती, आरोग्य, ईश्‍वर या पाच गोष्टी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. सकारात्मक विचार घेऊन तुम्ही बाहेर कसे पडता, यावर वयाचे मूल्यमापन होत असते. सर्व संघर्षमय जीवनातून गेल्यानंतर एक प्रगल्भता येते. संघर्षातून तावूनसुलाखून या टप्प्यापर्यंत पोहोचतो. आज मोबाईलमुळे घरातील संवाद हरवला आहे. आजी आजोबांच्या गोष्टीऐवजी मोबाईलची गेम सुरु झाली आहे. त्यामुळे मोबाईल मुलांपासून दूर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे”

विलास लांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वाती तोडकर यांनी, तर आभार अशोक चव्हाण यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.