Sangvi : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – पत्नीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी औंध रुग्णालय परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश जीवन खेराले (वय 40, रा. कामगार वसाहत, औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरकाल जीवन खेराले (वय 28) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल अशोक घोरन (वय 30), रोहित किशोर घोरन (वय 30), हितेश उर्फ गुड्डू किशोर घोरन (वय 26, सर्व रा. कामगार वसाहत, चेस्ट हॉस्पिटल, सांगवी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश याचे विशाल सोबत शनिवारी (दि. 20) किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्याचा राग विशालच्या मनात होता. तसेच रोहित याच्या पत्नीशी निलेशचे प्रेमप्रकरण होते. त्याची रोहितला माहिती होती. यातूनच एकदा रोहित याने निलेशच्या अंगावर दुचाकी घातली होती. हा सर्व प्रकार विशालला माहिती झाला. त्याने रोहित आणि त्याचा भाऊ हितेश यांच्यासोबत मिळून निलेशला मारण्याचा कट रचला.

शनिवारी रात्री तिघांनी मिळून निलेशला औंध रुग्णालयात सुप्रीटेंडेंटच्या घरासमोर आडबाजूला नेले. तिथे निलेशच्या डोक्यात फरशी घालून त्याला मारले. यामध्ये निलेशच्या डोक्याला आणि चेह-याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

निलेश याच्या बायकोने आत्महत्या केली असून त्याप्रकरणी त्याच्यावर सांगवी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तसेच सांगवी परिसरात लंगरवरून झालेल्या भांडणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like