Sangvi: कौटुंबिक कलहातून महिलेने नदीत उडी मारली, सांगवी पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

Sangvi: Woman jumps into river due to family quarrel, lives saved by Sangvi police आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला पिंपळे गुरव परिसरात राहते. लॉकडाऊनच्या काळात घरावर आर्थिक संकट आले आहे. त्यात भरीस भर म्हणून पती देखील कुठे कामधंदा करीत नाही.

एमपीसी न्यूज- कौटुंबिक कलहातून एका महिलेने पवना नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यातून महिलेला बाहेर काढले. ही घटना आज (रविवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. पोलिसांनी तत्परता दाखवल्याने महिलेचे प्राण वाचले आहेत. याबाबत सांगवी पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला पिंपळे गुरव परिसरात राहते. लॉकडाऊनच्या काळात घरावर आर्थिक संकट आले आहे. त्यात भरीस भर म्हणून पती देखील कुठे कामधंदा करीत नाही.

यावरून पती-पत्नीचे आज सकाळी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागात महिलेने आत्महत्येचा निर्णय घेतला. तिने पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळून पवना नदीत उडी मारली.

एका महिलेने पिंपळे गुरव येथे पाण्यात उडी मारली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. सांगवी पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलीस कर्मचारी अमोल लावंड, दीपक पिसे, हंसराज गोरे यांचे पथक घटनास्थळी तात्काळ रवाना केले.

पवना नदीत पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे महिला नदी पात्रात सुमारे 30 फूट आत वाहत गेली होती. पोलिसांनी पाण्यात उतरून रस्सीच्या सहाय्याने महिलेला नदीतून बाहेर काढले.

महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती व्यवस्थित झाली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग यांनी सांगितले आहे.

कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. महिलेचा जबाब घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान सांगवी पोलिसांनी समयसूचकता दाखवत महिलेला पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले आहेत. याबाबत सांगवी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.