Pimpri : सन्मित्र फाऊंडेशनकडून शहरात स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका व सन्मित्र फाऊंडेशन संचलित पोलीस व नागरिक मित्र सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने भाटनगर पिंपरी येथे आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

गेले चार दिवस शहरात झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पुरातील पाण्यामुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व एनजीओंना स्वच्छतेसाठी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत शहरातील पोलीस व नागरिक मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागासोबत पिंपरी येथील भाटनगर वस्तीमध्ये आज सकाळी 10 वाजेपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तेथे मोठ्या प्रमाणावर घाणीतील कचरा प्लास्टिक खराब कपडे व बाटल्या गोळा करण्यात आल्या.

काही ठिकाणी जनजीवन पूर्ववत झाल्याचे दिसून येत आहे. पाण्याची पातळी आता ओसरली असून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला. चिखल, दलदल झाली आहे. पॉलिथिन व राडारोडा साठल्यामुळे दुर्गंधी व विविध  प्रकारच्या समस्या उद्भवू नये म्हणून या सामाजिक संस्थेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या त्यांच्या मोहिमेचे पालिका आयुक्तांनीही कौतुक केले. या मोहिमेत इतर सामाजिक संस्थानीही सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

गेल्या चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने थैमान घातले होते. जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी झाले होते. अशातच सर्वत्र रोगराई पसरू नये म्हणून महापालिकेकडून सहकार्याचे आवाहन  केले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस व नागरिक मित्र संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल पालकर, प्रकाश मिर्झापुरे, लक्ष्मण शिंदे, कल्पना भाईंगडे, किरण हातणकर, जयेश भांबे, देवजीत साप्रिया, दत्तात्रय खांबे, विठ्ठल सहाणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे  अ प्रभाग आरोग्य विभाग टिम व आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे  व नवनाथ म्हस्के आदींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अधिक माहितीसाठी  9922437479 या नंबरवर संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.