ED Summons Sanjay Raut : संजय राऊत ईडी चौकशीसाठी राहणार अनुपस्थित? वाचा सविस्तर….

एमपीसी न्यूज – राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते माघार घेत नसल्यामुळे राज्यसरकार चांगलेच संकटात सापडले आहेत. या संकटातून शिवसेना मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने आज (दि. 28 जून) चौकशीसाठी समन्स बजावल्याने शिवसेना आणखी संकटात सापडल्याचे म्हटले जात आहे, परंतु पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे संजय राऊत (ED Summons Sanjay Raut) आज अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने चौकशीसाठी खा. संजय राऊत (ED Summons Sanjay Raut) यांना समन्स जारी केले होते. राज्यातील अभुतपूर्व सत्ताकारणाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांची ईडी चौकशी शिवसेनेला धक्का असल्याचे मानले जाते. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र या चौकशीसाठी तयार असल्याचे म्हणत सोशल मिडीयाद्वारे याबाबत प्रत्युत्तर देत बंडखोरांना चांगलाच टोला लगावला आहे.

संजय राऊत ट्विटमध्ये लिहितात, “मला आताचा समजलं ED नं मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी… हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या… मला अटक करा! जय महाराष्ट्र!” विशेष म्हणजे या ट्विटमध्ये राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टॅग केले आहे.

Todays Horoscope 28 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

दरम्यान, काही पुर्वनियोजित कार्यक्रमांमुळे शिवसेना नेते संजय राऊत आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

गुरू आशिष बिल्डरने जाॅंईंट व्हेंचर अंतर्गत 2006 साली पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. प्रकल्प 2008 साली सुरू झाला परंतु दहा वर्षानंतर पत्राचाळ प्रकल्प जैसे थे असल्याचे दिसून आले. चाळीचा कोणताच पुनर्विकास झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मूळ 678 रहिवाशांसहित म्हाडाच्या घरांबाबत सुद्धा बिल्डरने फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, विक्रीचे क्षेत्र बिल्डरने सात त्रयस्त विकासकांना विकल्याची धक्कादायक बाब समोर आली. जवळपास 1 हजार 34 कोटींना म्हाडाला बिल्डरने फसवले होते. या गुरू आशिष कंपनीचे संचालक राकेश वाधवान आहेत आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांचे वाधवान यांच्याशी चांगले संबंध आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राकेश वाधवान आणि प्रविण राऊत यांची नावे प्रामुख्याने आली. मध्यंतरी प्रवीण यांना अटक होऊन सुटका सुद्धा झाली मात्र पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना अटक करण्यात आली.

या घटनाक्रमात प्रवीण राऊत यांच्या खात्यातून 55 लाख संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले, त्यामुळे या घोटाळ्यात संजय राऊत यांचा सुद्धा सहभाग असू शकतो या संशयातून ईडीने राऊत यांना पुन्हा समन्स बजावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.