Talegaon Dabhade : उद्योजक संजय शहा यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक संजय विनोदकुमार शहा (वय 61) यांचे आज रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक विवाहित कन्या व एक नात असा परिवार आहे. माजी नगराध्यक्षा शशिकला शहा यांचे ते पुत्र तर नामवंत उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दीपक शहा यांचे ते बंधू होत.

रोटरी क्लबच्या माध्यमातून संजय शहा यांनी भरीव सामाजिक काम केले. विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी सढळ हाताने मदत केली होती. खेळाचीही त्यांना विशेष आवड होती. ते स्वतः चांगले क्रिकेट व बॅडमिंटन खेळत असत.

आशिष रोटो प्लास्ट व स्नेह गर्ल्स होस्टेलचे ते संस्थापक संचालक होते. चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजचे संचालक म्हणूनही त्यांनी शिक्षणक्षेत्रात कामात चांगला ठसा उमटवला होता.

संजय शहा यांच्या कडोलकर कॉलनीतील निवासस्थानापासून उद्या (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजता अंत्ययात्रा निघणार असून बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या परिवाराच्या वतीने देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.