Nigdi : विजूमामा आणि मी

अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील यांनी सांगितल्या दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणी

एमपीसी न्यूज- अलीकडेच ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक सच्चा कलाकार हरपला अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या सोबत भूमिका केलेल्या अनेक कलावंतांनी विजय चव्हाण यांच्या अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकताना ते माणूस म्हणूनही खूप चांगले होते अशी भावना व्यक्त केली आहे. अथर्व अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील यांना देखील विजय चव्हाण यांच्याबरोबर भूमिका करण्याची संधी मिळाली. डॉ. पाटील यांनी विजय चव्हाण उर्फ विजय मामा यांच्याविषयी सांगितलेल्या काही आठवणी…..

परवा विजय चव्हाण उर्फ आपले लाडके विजू मामा ( सगळी इंडस्ट्री त्यांना प्रेमानं मामाच म्हणायची) आपल्याला सोडून गेले आणि मन सुन्न झालं. त्यांच्या सोबत झालेल्या भेटीचा,सोबत केलेल्या कामाचा, गप्पांचा असा एक आठवणींचा चित्रपटच डोळ्यासमोर दिसू लागला. तेव्हापासून मामांबद्दल लिहूया असा विचार येत होता म्हणून शेवटी आज लिहायला घेतले.

विजू मामा ह्यांचं मोरूची मावशी हे नाटक मी 1987 साली बी. जे.मेडिकल कॉलेजला शिकत असता बालगंधर्वला पाहिलं, जेव्हा त्यात प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन सुद्धा काम करायचे, तेंव्हाच मी त्यांचं काम बघून वेडा झालो होतो. कालांतराने बी जे मेडिकलच्या गॅदरिंगला 1995 मध्ये मी पहिल्यांदा स्वतः मोरूची मावशी साकारली, तेंव्हापासून ते आतापर्यंत मी मावशीची भूमिका करतोय आणि परमेश्वराच्या कृपेने रसिक प्रेक्षकांना आवडते आहे.

पण एक सुप्त इच्छा मनात होती की कधीतरी विजू मामांची भेट व्हावी आणि त्यांना आपली मावशी बघायला बोलवावं आणि त्यांनी आपली मावशी बघावी. आचार्य अत्रे यांनी हे नाटक लिहिले, सुरुवातीला बापूराव माने यांनी काही प्रयोग केले. तसेच मोहन जोशी यांनी सुद्धा मोरूची मावशी केली. पण खऱ्या अर्थाने सगळा महाराष्ट्र मावशी म्हणून ज्यांना ओळखतो ते विजय चव्हाण यांनाच. पण विजू मामांना माझी मावशी दाखवण्याचा योग काही आला नाही. परंतु त्यांच्या सोबत चित्रपटात काम करण्याचा योग मात्र मला मिळाला. त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांना माझ्या मावशीच्या वेषातील फोटो दाखवता आले, ‘अरे गोड दिसतोस की तू’ हे ऐकता आले एवढेच काय ते समाधान.

माझी आणि त्यांची पहिली भेट झाली ती सतीश पुळेकर दिग्दर्शित ‘कथा एका निरोपाची’ ह्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी. खोपोली आणि चौक परिसरात या सिनेमाचं शूटिंग झालं, त्याचं नाव नंतर बदलून ‘अर्जंट बाई पाहिजे’ असे करण्यात आलं. त्या फिल्मच्या शूटिंगला खूप मज्जा आली, गप्पा मारल्या, त्यांना मी विनंती केली की माझा मोरूची मावशीचा प्रयोग बघायला याल का? तेव्हा ते म्हणाले ‘बघू केव्हातरी’

त्यांनी तेव्हा एक भारी गमतीदार किस्सा सांगितला. एकदा कोकणात कुणीतरी त्यांना मोरूची मावशीचा प्रयोग बघायला प्रमुख पाहुणे म्हणुन बोलावलं आणि ऐन वेळी त्यांना तुम्ही आमच्या सोबत मावशीचं काम करा अशी विनंती केली, ते त्यांना म्हणाले, ” अरे, नाही ते शक्य नाही कारण आमचं वेगळं सेट होतं, तुमचं नाटक वेगळं बसलं असेल” त्यावर “तुमच्या नाटकाचा व्हिडिओ बघून जसेच्या तसे नाटक बसवलं आहे, काही अडचण येणार नाही असे सांगत तिथल्या गावातील लोकांनी खूप आग्रह केला. मग काय? खरंच त्यांनी ऐनवेळी साडी नेसून थोडंसं काम करावं लागलं आणि त्यांनी ते आनंदानं केलं. गावकऱ्यांना त्यांनी नाराज केले नाही. नंतर मला गमतीने म्हणाले की, म्हणून आता कुठे मोरूची मावशी बघायला जायला मला भीती वाटते.

आम्ही त्यानंतर ‘पकडा पकडी’ ह्या सिनेमात सोबत काम केले. त्यावेळी त्या सिनेमात अशोक सराफ सुद्धा होते, आणि आमचा तिघांचा एकत्र सीन होता मला जरा टेन्शन आलं होतं, पण मामांनी माझं टेन्शन घालवले. नंतर काही वर्षांनी चार्ली या सिनेमातसुद्धा आम्ही सोबत काम केलं. तो सिनेमा काही कारणांमुळे पूर्ण झाला नाही.

शूटिंगच्या सेटवर किंवा हॉटेलवर असताना वेळ मिळेल तेव्हा वॉकिंग करायचे, फिट राहण्याचा प्रयत्न करतोय म्हणायचे. मामा म्हणजे खरच भन्नाट माणूस होते. सतत सेटवर त्यांचं विनोद करणं, हशे वसूल करणं चालू असायचं, सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोबाईलच्या जमान्यात सुद्धा त्यांच्याकडे मोबाईल नव्हता. त्यांना फोन करायचा झाल्यास त्यांना घरीच लँडलाईनला फोन करायला लागायचा आणि ते म्हणायचे, “मोबाइल नाही म्हणून माझे काहीही नुकसान होत नाही. ज्यांना मला खऱ्या अर्थाने कॉन्टॅक्ट करायचा असेल ते मला कॉन्टॅक्ट करतीलच”

विजुमामा, अहो मावशीचं काम करताना तुम्ही स्टेजवर साडी सोडून तिथेच लगेच पटकन कुणाला कळायच्या आत पुन्हा निऱ्या बांधून साडी नेसायचात.. केवळ अशक्य ! जे कधीच मला जमलं नाही.आणि कधीही जमणार देखील नाही. हॅट्स ऑफ !! जशी तुम्ही रंगभूमी गाजवली तशीच चित्रपट सृष्टी सुद्धा गाजवलीत. मामा तुम्हाला आम्ही कायम मिस करू, भावपूर्ण श्रद्धांजली !!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.