Deccan College Abhimat University : डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठात संस्कृतदिन संपन्न

एमपीसी न्यूज – दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे श्रावणीपौर्णिमेला राष्ट्रिय संस्कृत दिन साजरा केला जातो. त्याला अनुलक्षून बुधवारी (दि.17) डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठात संस्कृतदिन संपन्न झाला.

17 ऑगस्ट हा विद्यापीठाचा पुनःस्थापना दिन असल्याने त्या दिवशीच्या पहिल्या सत्रात झालेल्या कार्यक्रमात‘गोखले इन्स्टिट्यूट’चे कुलगुरु डॉ.अजित रानडे यांचे, तसेच डेक्कन कॉलेज पूना ट्रस्टच्या ट्रस्टी डॉ. शिरीन जिजिभाई यांचे अभिभाषण झाले.दिवसाच्या दुसऱ्या सत्रात संस्कृतदिन साजरा झाला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून या वर्षीचा संस्कृतदिन ‘भारतामृतस्तवः’ या नावाने सादर झाला.यामध्ये देशभक्तिपर संस्कृतगीते आयोजित केली होती.गणेशवंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. डॉ. प्रसाद जोशी यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे यांनी मार्गदर्शन केले.

देशभक्तिपर गीतांचा संस्कृत अनुवाद विद्यापीठातील डॉ.कीर्ति कुलकर्णी यांनी केला होता. विद्यापीठातील विद्यार्थी कौशिकी कलेढोणकर, अद्रिजा मुखर्जी, तार्किक खातू व विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. बन्सी लव्हाळे, डॉ.ओंकार जोशी, मुग्धा चंद्रात्रे यांनी गीतगायन केले. सिंथेसायझरसाठी ओंकार पाटणकर, संवादिनीसाठी संस्कार जानोरकर, तालवाद्यांसाठी उद्धव कदम, व तबल्यासाठी मुग्धा दाते यांनी उत्तम साथसंगत करून कार्यक्रमाचा जोश वृद्धिंगत केला.

जुई सगदेव यांनी या गीतांवर केलेल्या नृत्याने व  संदीप ढिकले यांनी सादर केलेल्या चित्रफितीने देशभक्तीची भावना दृग्गोचर झाली.विभागात कार्यरत असणारे डॉ.शिल्पा सुमंत, डॉ. हरी पालवे, डॉ. भव शर्मा, राधिका देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या निर्मितीत मोलाची मदत केली. डॉ.आनंद पंड्या व डॉ. भावना बालटे यांनी सूत्रसंचालन केले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, विद्यापीठाचा पुनःस्थापना दिन आणि संस्कृतदिन अशा तिहेरी योगाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला श्रोतृवृंदाचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.