Sant Tukaramnagar :’दिवाळी मध्यान्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – ‘दिवाळी मध्यान्ह’ ही साहित्यविश्वातील पहिली ऐतिहासिक काव्यमैफल पुस्तकांच्या साक्षीने संपन्न होत आहे. लौकिकाकडून अलौकिकाकडे जाण्याचा प्रवास ग्रंथांमुळे साकार होतो. सेवा भागीले अहंकार बरोबर भक्ती होय. साहित्यभक्ती करताना ग्रंथांचे वाचन आवश्यक आहे, असे मत व्याख्याते, निवेदक प्रा. दिगंबर ढोकले यांनी व्यक्त केले.

शब्दधन काव्यमंच आणि सोहम् सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५००० पुस्तकांच्या साक्षीने कवींच्या प्रखर लेखणीचा धगधगता आविष्कार असलेली ‘दिवाळी मध्यान्ह’ ही अभिनव काव्यमैफल आयोजित करण्यात आली होती, तिला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी प्रा. ढोकले बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे अध्यक्षस्थानी होते.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. अनु गायकवाड, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक- अध्यक्ष सुरेश कंक, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे आदी मान्यवर त्यावेळी उपस्थिती होते.

माणसातला कार्यकर्ता कायम जिवंत असला; तरच सामाजिक क्रांती होईल, असे मत पुरुषोत्तम सदाफुले यांनी मांडले. कवींनी जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या आशयगर्भ कवितांचे प्रभावी लेखन केले; तर काव्यरसिक निर्माण होतील, असा आशावाद मुरलीधर साठे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला.

कार्यक्रमापूर्वी, सर्व मान्यवर, सहभागी कवी आणि रसिक यांचे सुवासिनींनी विधिवत औक्षण केले. संगीता झिंजुरके यांच्या सुरेल आवाजातील स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

‘दिवाळी मध्यान्ह’ काव्यमैफलीत आय.के.शेख यांच्या आध्यात्मिक रचनेने चैतन्य निर्माण केले. अरुण कांबळे (अनाथ शेतकरी), आत्माराम हारे (वृद्धाश्रम), निशिकांत गुमास्ते (आनंद दिवाळी), पीतांबर लोहार (लक्ष्मी), शोभा जोशी (ग्रंथांच्या सहवासात), सुरेश कंक (कृष्णार्पण), शामराव सरकाळे (बळिराजाची व्यथा) या कवितांमधील विषयवैविध्यामुळे मैफलीची रंगत वाढली. सीमा गांधी आणि सविता इंगळे यांच्या स्त्री जाणिवांच्या रचनांनी रसिकांना अंतर्मुख केले; तर संगीता झिंजुरके यांच्या गीताने मंत्रमुग्ध केले. देवेंद्र गावंडे यांच्या सामाजिक दैन्यावर भाष्य करणाऱ्या गीताला आणि राज अहेरराव यांच्या आख्यानकाव्याला दाद मिळाली. बालकवयित्री सानिका कांबळे हिच्या ‘स्कूटर’ या हास्यकवितेने आणि आनंद मुळूक यांच्या विडंबनाने मैफलीत हास्य फुलवले. मधुश्री ओव्हाळ, राजेंद्र घावटे, शरद शेजवळ, फुलवती जगताप, सुभाष शहा, संभाजी रणसिंग यांच्या कविता उल्लेखनीय होत्या.

मुरलीधर दळवी, नंदकुमार कांबळे, अण्णा जोगदंड, जयश्री गुमास्ते, रजनी अहेरराव, शिवाजीराव शिर्के यांनी संयोजनात परिश्रम घेतले. मधुश्री ओव्हाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.