Pimpri: सारथीला आता ‘चॅटबॉट ‘ची सुविधा!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना उपयोगी ठरत असलेली सारथी हेल्पलाईन अपग्रेड केली जाणार असून सारथीला आता आभासी सहाय्यक (चॅटबॉट )ची सुविधा उलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्तावर करसंकल विभागासंदर्भात ‘चॅटबॉट ‘ची सुविधा उपलब्ध केली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना आपल्या मिळकतीची माहिती त्वरित मिळणार आहे.  याद्वारे नागरिकांना मिळकत कर देखील भरता येणार आहे. त्याचबरोबर नागरवस्ती विभागागाकरिता PCMC NAGARVASTI या मोबाईल अँपची निर्मिती देखील करण्यात आली आहे. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते उद्या (शनिवारी)या सुविधांचे उद्‌घाटन होणार आहे.

महापालिकेतर्फे शहरवासियांसाठी माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महापालिका संकेतस्थळ, मोबाईल अँप, सारथी हेल्पालाईनचा समावेश आहे. सारथी हेल्पलाईन आता अपग्रेड केली जाणार  आहे. नागरिकांना प्रायोगिक तत्वावर करसंकलन विभागासंदर्भात नागरिकांचे प्रश्न, अडचणींची उत्तरे ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने ‘स्मार्ट सारथी’च्या स्वरुपात आभासी सहाय्यक (चॅटबॉट )या प्रणालीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना आपल्या मिळकतीसंदर्भात आवश्यक ती माहिती तातडीने, 24×7 तास उपलब्ध होणार आहे. याद्वारे नागरिकांना मिळकत कर देखील भरता येणार आहे. या चॅटबोटची सुविधा महापालिकेच्या www.pcmcindindia.gov.in या संकेतस्थळाद्वारे प्राप्त होणार आहे.

आभासी सहाय्यक(चॅटबॉट )या नव्याने विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमध्ये कृत्रिम बृध्दीमतेचा वापर करण्यात आला आहे. नागरिकांमार्फत विचारण्यात येणा-या प्रश्वांवर संगणक प्रणालीद्वारे कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रश्न आत्मसात करुन त्यानंतर नागरिकांना योग्य ते उत्तर ‘चॅटबोट’ मार्फत प्राप्त होणार आहे. याद्वारे मिळकत कर भरणा कसा करावा, कराचा किती भरणा करावयाचा आहे. कर भरणा कोठे करावा, कर संकलन विभागीय कार्यालय कोठे आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे नागरिकांना ‘चॅटबोट’द्वारे मिळणार आहेत. त्यानुसार नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळकत कराचा भरणा करणे सहज शक्य होणार आहे.

त्याचप्रमाणे नागरवस्ती विभागाकडील विविध योजनांची माहिती, योजनातील पात्र/ अपात्र लाभार्थींबाबतची माहिती, योजनांच्या लाभाविषयीची माहिती. त्याचबरोबर बँकेमध्ये लाभासंदर्भात बँक खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी PCMC NAGARVASTI या मोबाईल अँपची निर्मिती देखील करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.