Pune: सवाई गंधर्व महोत्सवात दुसर्‍या दिवशी झंकारले सरोद–सतारीचे सूर

एमपीसी न्यूज : ‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्रात संदीप भट्टाचारजी यांचे गायन तर मोरमुकुट व मनोज केडिया या बंधूंचे सतार व सरोद वादन रंगले होते. 

दुसर्‍या दिवसाचा प्रारंभ संदीप भट्टाचारजी यांच्या सुरेल गायनाने झाला. त्यां::;:नी राग मुलतानीने आपल्या गायनाची सुरुवात करत विलंबित एक ताल, द्रुत व मध्यलयीतील तीन ताल यांचे सदरीकरण केले. यावेळी ‘कवन देस गये..’, ‘गगन मुरलिया मोरी रे…’, ‘नैनमे आनबान.. या रचना पेश केल्या. त्यानंतर राग पूरिया धनाश्रीमध्ये ‘खुश रहे सनम मेरा…’ ही बंदिश सादर केली. ‘बाजे रे मुरलिया बाजे…’ या भजनाने त्यांनी आपल्या मैफलीला विराम दिला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अनुजा भावे क्षीरसागर व वैशाली कुबेर (तानपुरा), माऊली टकाळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर मोरमुकुट व मनोज केडिया या बंधूंचे सतार व सरोद वादन रंगले. त्यांनी राग झिंजोटीने आपल्या वादनास सुरुवात केली. “जहा स्वर है वही ईश्वर है” असे म्हणत त्यांनी स्वरमंचाला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी राग मिश्रबिरू पेश केला. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्याची साथसंगत केली.

स्वर शताब्दी- प्रकाशचित्र प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी काढलेल्या प्रकाशचित्रांचे दरवर्षी महोत्सवादरम्यान होणारे प्रकाशचित्र प्रदर्शन हे रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या प्रकाशचित्र प्रदर्शनाचे हे सलग तेरावे वर्ष असून यावर्षी ‘स्वर शताब्दी’ या संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारलेले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील चार प्रतिभावंत कलाकारांचे जन्मशताब्दी वर्ष आपण २०१९-२० या वर्षात साजरे करत आहोत. यामध्ये उस्ताद अल्लारखाँ,  पं. फिरोज दस्तूर,  पं. रविशंकर आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांचा समावेश आहे.

या वर्षीच्या ‘स्वर शताब्दी’ प्रदर्शनात या चारही दिग्गज कलाकारांच्या प्रकाशचित्रांचा समावेश आहे. या निमित्ताने या चारही कलाकारांना आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रदर्शनाला रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

संतूरच्या सूरांनी दुसर्‍या दिवसाची सांगता

महोत्सवाच्र्‍या दुसऱ्या दिवसाची सांगता मंजिरी आलेगावकर यांचे स्वर व पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरच्या सुरांनी झाली. मंजिरी आलेगावकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात जोड राग जयताश्री याने केली. यात त्यांनी ‘जब दे पियू सपनेमे..’, ‘बहुत दिन बिते…’ या रचना सादर केल्या. त्यानंतर राग नंद मध्ये ‘बन बन ढूंढ म्हारे सैया..’, ‘राजन अब तो आजा..’ या बंदिशी पेश केल्या.

त्यानंतर कुमार गंधर्वांनी संगीत दिलेल्या कबीरचे निर्गुडी भजन ‘हिरना समझ बुझ बन चलना…’ सादर करून मैफलीला विराम दिला. त्यांना अजित किंबहुने (तबला), रोहित मराठे (हार्मोनियम), कीर्ति कुमठेकर, सायली कडू (तानपुरा), स्वरली आलेगावकर यांनी साथसंगत केली.

त्यानंतर पं. शिवकुमार शर्मा यांनी राग रागेश्रीमध्ये आपल्या संतूर वादनाची सुरुवात केली. आलाप, जोड नंतर झपताल व तीन तालातील रचना पेश केल्या. “हा महोत्सव म्हणजे संगीतातील तीर्थस्थान आहे. पं. भीमसेन जोशी हे संगीतातील संत, योगी होते. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. ते एक आध्यात्मिक व्यक्ती होते. त्या नात्याने आम्ही गुरुबंधूही होतो,” अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांना पं. शुभंकर बॅनर्जी (तबला), अराई ताकाइरो (संतूर सहवादन) यांनी साथसंगत केली. ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’चे निवेदक म्हणून आनंद देशमुख यांना ५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.