Sangvi : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घर घेण्यासाठी माहेराहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2009 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.

कुंदन शेषराव कसबे (वय 38), सासरे शेषराव कबसे (वय 66), सासू नंदा कसबे (वय 60), दीर नरेंद्र कसबे (वय 32) आणि नणंद वर्षा जीवन कांबळे (वय 34, सर्व रा. पवारनगर, जुनी सांगवी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 33 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेकडे नवीन घर व गाडी घेण्यासाठी माहेराहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी वेळोवेळी शिवीगाळ आणि हाताने मारहाण करीत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

कुंदन कसबे यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला. पत्नी ही शीघ्रकोपी असून किरकोळ कारणांवरून संतापून नेहमी माहेरी निघून जाते. त्यामुळे आपण घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्याला दिलेल्या त्रासाबद्दल यापूर्वी आपण दोन वेळा पोलीस तक्रार केलेली आहे. तिच्यापुढे कोणताही पर्याय उरला नसल्याने आमच्या विरुद्ध खोटी फिर्याद दिली आहे, असा आरोप कुंदन कसबे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.