Saswad Crime News : गावठी पिस्तूल बाळगणारा ‘मायाभाई’ जेरबंद; दोन जिवंत काडतूस जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज : सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जेजुरी नाका येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून शिताफीने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दुचाकी, असा एकूण 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गौरव उर्फ मायाभाई बाळासो. कामथे (वय 22, रा. खळद गाव, ता. पुरंदर, जि. पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी जेजुरी नाका येथे एकजण काळ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवर गावठी पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी जेजुरी नाका परिसरात सापळा लावून एकाला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याजवळ लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आली.

पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि मोपेड दुचाकी, असा एकूण 85  हजारांचा मुद्देमाल जप्त केला.  पुढील तपासासाठी त्याला सासवड पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार चंद्रकांत झेंडे, पोलीस नाईक विजय कांचन, कॉन्स्टेबल धिरज जाधव, अभिजित एकशिंगे, दगडू विरकर यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.