Satara : 1962 च्या युद्धानंतर चीनने 45,000 चौ.कि.मी. भारतीय जमीन ताब्यात घेतली होती- शरद पवार

Satara: After the 1962 war, China was taken over 45,000 sq.Km Indian land - Sharad Pawar राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण नको, नाव न घेता राहुल गांधी यांना सल्ला

एमपीसी न्यूज :  1962 च्या युद्धानंतर चीनने 45,000 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली होती, हे कोणीही विसरू शकत नाही, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना करून दिली. चीनशी झालेल्या संघर्षावरून कॉंग्रेस आणि भाजपमधील आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींचे राजकारण केले जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता दिला. 

चीनच्या आक्रमणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय प्रदेश चीनच्या ताब्यात दिला, या राहुल गांधी यांच्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता, पवार यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

संरक्षणमंत्र्यांच्या अपयशाचा निष्कर्ष काढण्याची घाई नको

लडाखमधील गलवान खोऱ्यात संरक्षण मंत्र्यांच्या अपयशाचे खापर फोडण्याची घाई करून चालणार नाही, कारण गस्ती दरम्यान भारतीय सैनिक सतर्क होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पवार म्हणाले की, हा संपूर्ण भाग संवेदनशील स्वरूपाचा आहे. गलवान खोऱ्यामध्ये चीनने चिथावणीखोर भूमिका घेतली. विशेष म्हणजे 15 जूनला पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

‘चीनने भारताच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला’

माजी संरक्षणमंत्री म्हणाले की, भारत आपल्या क्षेत्रामध्ये गालवान खोऱ्यात दळणवळणाच्या उद्देशाने रस्ता बनवीत आहे. त्यांनी (चिनी सैनिकांनी) आमच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि धक्काबुक्की केली.” हे कोणाचेही अपयश नाही. गस्त घालताना कोणी (आपल्या क्षेत्रात) आला तर ते कधीही येऊ शकतात. हे दिल्लीत बसलेल्या संरक्षणमंत्र्यांचे अपयश असल्याचे आपण म्हणू शकत नाही.”

गस्त सुरू होती तिथे संघर्ष झाला म्हणजे आपण सतर्क होतो. आपण तेथे नसतो तर ते (चिनी सैनिक) कधी आले आणि गेले हे देखील आपल्याला ठाऊक नसते. त्यामुळे असे आरोप करणे मला योग्य वाटत नाही, असे पवार म्हणाले.

‘राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतेही राजकारण नको’

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता पवार म्हणाले की, 1962 च्या दोन देशांमधील युद्धानंतर चीनने भारताच्या सुमारे 45,000 चौरस किलोमीटर जागेवर कब्जा केला हे कोणीही विसरू शकत नाही. ही भूमी अद्याप चीनकडे आहे. त्याने (चीन) पुन्हा काही भागात अतिक्रमण केले आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. पण जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा आपण सत्तेत असताना काय घडले होते, हे देखील पाहिले पाहिजे. जर इतकी मोठी जमीन घेतली तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे आणि मला वाटते की त्याचे राजकारण केले जाऊ नये.

पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रियेची गरज नाही – शरद पवार

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नुकत्याच झालेल्या टीकेबद्दल विचारले असता, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारले होते आणि त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. पाडळकर म्हणाले होते की, “पवार महाराष्ट्राला लागण झालेला कोरोना आहे.” त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन करून पडळकर यांचा निषेध केला.

व्हिडिओ सौजन्य – एबीपी न्यूज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.