Satara : भरधाव कारच्या भीषण अपघातात पुण्यातील दाम्पत्य ठार

एमपीसी न्यूज : चालकाचा करवरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील हडपसर येथील महिला डॉक्टर आणि तिचा इंजिनिअर पती गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील भोसलेवाडी गावाजवळ शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

डॉ.अनुजा अमित गावडे (वय-35) व अमित गावडे (वय-38) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. गावडे पती-पत्नी पुण्यातील हडपसर भागातील ग्रीन फिल्ड सोसायटीत रहात होते. अमित हे इंजिनिअर होते. लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या मुलाला आणण्यासाठी हे दाम्पत्य कोल्हापूरकडे जात होते.

सातारा हद्दीत भोसलेवाडी गावाच्या हद्दीत चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्यांची भरधाव कार रस्ता दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यात दोघेही गंभीर जखमी होऊन डॉ. अनुजा आणि अमित हे दोघेही जागीच ठार झाले.

या दाम्पत्याला 5 वर्षांचा आमिष हा मुलगा आहे. लॉकडाऊनमुळे तो कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील नित्तूर या गावी येथे आजी- आजोबांकडे अडकला होता. आईवडिळांच्या आठवणीने तो कायम रडायचा. त्यामुळे त्याला आणण्यासाठी गावडे दाम्पत्य चंदगडला जात होते.

मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यामुळे त्यांची आणि आमिषची भेट होऊ शकली नाही. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर नित्तूर आणि हडपसर परिसरावर शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like