Maharashtra: युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजीत तांबे 

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजीत तांबे यांची निवड झाली आहे. निवडणुकीत तांबे हे सर्वाधिक मते घेऊन प्रदेशाध्यक्ष झाले असून त्यांच्यासोबतच आमदार अमित झनक हे दुस-या क्रमांकाची मते घेऊन उपाध्यक्ष झाले आहेत. त्यासोबतच कुणाल राऊत हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे. याखेरीज 60 युवकांची प्रदेश कार्यकारणी देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तयार झाली आहे.   

सत्यजीत तांबे यांच्या निवडीने युवक काँग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. येऊ घातलेल्या 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या निवडीने काँग्रेस पक्षाला फायदा होईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

 नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा परिचय!

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 ला कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून एनएसयुआय व युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटनबांधणी त्यांनी केली आहे.  अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला कॉंग्रेसमधील युवानेता अशी त्यांची ओळख आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत.

गल्ली ते दिल्ली कॉंग्रेसमधील नेते व कार्यकर्त्यांसोबत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासातील युवानेता अशी देखील त्यांची ओळख आहे. या आगोदर दोन वेळा त्यांनी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ते युवक कॉंग्रेसमध्ये कार्यरत होते.  नागरी विकास, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.