Talegaon : महापुराचे संकट दूर होण्यासाठी रविवारी सामुहिक सत्यनारायण महापूजा

1,111 दाम्पत्ये घालणार परमेश्वराला साकडे; पूरग्रस्त कुटुंबाला प्रातिनिधीक स्वरूपात एक गाय व एक म्हैस देणार; पूरग्रस्तांसाठी 3,000 ब्लँकेट व 15,000 पाण्याच्या बाटल्या 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रावरील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवरील महापुराचे संकट दूर व्हावे तसेच संपूर्ण राज्यावर निसर्गाची कृपादृष्टी राहावी, यासाठी परमेश्वराला साकडे घालण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे उद्या (18 रविवारी) सामुहिक सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून त्यात 1,111 दाम्पत्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापुजेचे मुख्य संयोजक व माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी दिली. 

मावळातील पावसाने साथ दिल्यामुळे सुखशांती  लाभावी म्हणून या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते पन अतिवृष्टीच्या थैमानामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यावर महापूराचे भीषण संकट ओढावले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मावळ तालुक्यातील रहिवाशांनी सढळ मदतीचा हात पुढे केलेलाच आहे. त्याच बरोबर हे संकट दूर होऊन राज्यात सुबत्ता यावी, यासाठी परमेश्वराला सामुहिक साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महापूजेच्या निमित्ताने पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही शेळके यांनी केले आहे.

ज्या पशुधनावर गरीब शेतकरी कुटुंबाची उपजीविका आहे ते उद्या प्रातिनिधीक स्वरुपात एका कुटुंबास एक गाय व एक म्हैस देण्यात येणार आहे. तसेच नगरपालिकेने व प्रत्येक गावाने एक गाय व एक म्हैस या प्रमाणे या गरीब कुटुंबाना यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच फाऊंडेशन तर्फे पूरग्रस्तांसाठी 3000 ब्लँकेट व 15000 पाण्याच्या बाटल्या पाठवण्यात आले आहेत.

हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता ही सामुहिक सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यात 1,111 दाम्पत्ये सहभागी होणार आहेत. मावळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सामुहिक सत्यनारायण महापूजा आयोजन प्रथमच होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या ऐतिहासिक महापूजेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्यास कामधेनूची पितळी मूर्ती देण्यात येणार असून पुरुष यजमानांना उपरणे-टोपी तर सुवासिनींना खण-नारळाची ओटी देण्यात येणार आहे. महापूजेनिमित्त दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आहे. या महापुजेचा लाभ घेऊन पूरग्रस्त बांधवांसाठी प्रार्थना करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.