Pune : कात्रज बायोगॅस प्रकल्पातील गैरव्यवहाराची 15 दिवसांत चौकशी – सौरभ राव

एमपीसी न्यूज – कात्रज बायोगॅस प्रकल्पातील गैरव्यवहाराची 15 दिवसांत चौकशी करणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा आवाज उठविला. त्याला इतर पक्षाच्याही नगरसेवकांची साथ मिळाली.

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी कचऱ्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. कचरा जिरविण्यासाठी ब्राझीलमध्ये चांगले उपक्रम राबविले जातात. त्याचा पुणे महापालिकेने अभ्यास करावा, अशी अपेक्षा काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी व्यक्त केली. कचऱ्यातून लक्ष्मी निघत असल्याचेही ते म्हणाले. तर, ब्राझील – अमेरिकेच्या कचऱ्याचे मॉडेलवर चर्चा होते. मात्र, त्या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न लाखात आहे.

आपले उत्पन्न हजारात असल्याची मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली. तर, महापालिकेच्या कामकाजाचा दोन वर्षेच नव्हे तर 10 वर्षांचाही हिशोब देण्याची माझ्यात हिम्मत असल्याचे आव्हान जगताप यांनी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना दिले. वसंत मोरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आहे़.

याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, येत्या पंधरा दिवसात या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिका-यांवर कारवाई केली जाईल़, असे आश्वासनही आयुक्तांनी सभागृहात दिले. काँगेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनीही प्रशासनाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.