Savaniee Ravindrra: सावनी रवींद्रच्या ‘वंदे गणपती’ गाण्याला संगीतरसिकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद

वंदे गणपती ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली बंदिश माझ्या आईच्या गुरु वीणा सहस्रबुध्दे यांनी गायलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून या बंदिशीसोबत एक ऋणानुबंध जुळला आहे.

एमपीसी न्यूज – सुमधूर गळ्याच्या मूळच्या पिंपरी-चिंचवडकर असलेल्या गायिका सावनी रवींद्रने मराठी, गुजराती, तमीळ, तेलगू, मल्याळी, कानडी आणि बंगाली अशा सात भारतीय भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिकांवर आपल्या सुरांची मोहिनी घातली आहे. यानंतर नुकतीच तिने गणेशोत्सवानिर्मित्ताने ‘वंदे गणपती’ ही संस्कृत बंदिश गायली. या गाण्याला सध्या संगीत रसिकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतोय.

संस्कृतमध्ये पदवी घेतलेल्या गायिका सावनी रवींद्रची ब-याच काळापासून संस्कृतमध्ये गाणे गाण्याची इच्छा होती. ही इच्छा ‘वंदे गणपती’ या गाण्यातून पूर्ण झाली आहे.

या गणेशभक्तीपर गाण्याबद्दल बोलताना सावनी म्हणाली, “वंदे गणपती ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली बंदिश माझ्या आईच्या गुरु वीणा सहस्रबुध्दे यांनी गायलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून या बंदिशीसोबत एक ऋणानुबंध जुळला आहे.

पंडित काशीनाथ बोडस यांची ही रचना सतत मनात रुंजी घालत राहिलीय. त्याच बंदिशीला कर्नाटक शास्त्रीय संगीताची किनार देण्याचं काम माझा मित्र आर. संजय याने केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना एक सकारात्मक मंगलमय गाणे रसिकांच्या भेटीला घेऊन आले. आणि ते रसिकांनी उचलून धरले, याचा आनंद आहे.”

सावनीच्या कर्नाटक शास्त्रीय संगीतात सजलेल्या सुरांना अभिनेत्री आणि नृत्यांगना अदिती द्रविडने भरतनाट्यम शैलीत साकारल्याने हे गाणे व्हिज्युअल ट्रिट झाले आहे. डॉ. आशिष धांडे निर्मित या गाण्याला व्हिज्युअल डायरी मोशन पिक्चर्सच्या श्रेयस शिंदे ह्यांनी चित्रीत केले आहे. टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअलचे हे गाणे गणेश आराधनेत रसिकांना स्वरमयी साथ देत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.