Savarkar : सावरकरांचे विचार समाजात पोहोचवणे आवश्यक – योगेश सोमण

एमपीसी न्यूज – आपण सावरकरांच्या कष्टांना उजाळा देतो. त्यामुळे त्यांच्या विचारांना पोहोचवण्याचे आपल्याकडून राहून जाते. सावरकरांबद्दल (Savarkar) बोलताना त्यांची राष्ट्रभक्ती, शैक्षणिक धोरण, संरक्षण धोरण अशा विविध वैचारिक मुद्द्यांवर बोलले पाहिजे. चापेकर बंधू, सावरकर बंधू यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिले. ही भारताच्या इतिहासातील अतिशय दुर्मिळ बाब आहे. याबाबत समाजात बोलले पाहिजे, असे प्रतिपादन नामवंत अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, वक्ते योगेश सोमण यांनी केले.

निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्रवीर सावरकर (Savarkar) मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प योगेश सोमण यांनी गुंफले. यावेळी ते ‘आजच्या परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेताना’ या विषयावर बोलत होते. प्रमुख पाहुणे जनसेवा सहकारी बँकेचे संचालक राजन वडके, तसेच मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर तसेच रमेश बनगोंडे आदी यावेळी उपस्थित होते.

योगेश सोमण म्हणाले, “दोन जन्मठेपेच्या शिक्षा भोगून आल्यानंतर पुण्यात सावरकर यांचा मोठा सत्कार करण्यात आला. तेंव्हा त्यांना ‘मृत्युंजय’ असे संबोधन देण्यात आले. सावरकरांबद्दल (Savarkar) हल्ली काही लोक नकारार्थी बोलत आहेत. सावरकरांनी माफी मागितली नाही. तर दयेचा अर्ज केला होता. ते अर्जही फेटाळले असल्याचे त्यांनी त्यांच्या ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात स्वतः लिहून ठेवले आहे. दयेचा अर्ज करणे हा त्यांचा न्यायिक अधिकार होता. सावरकर हे राष्ट्राचा विचार करणारे राजकीय नेते होते. राष्ट्रकार्य करण्यासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कैदेतून सुटका करून घेणे हे आपले कर्तव्य आहे, असे त्यांचे मत होते.

YCM Hospital : निवृत्त होता-होता खरेदीचा आदेश, निवृत्त वैद्यकीय संचालकावर दंडात्मक कारवाई

सावरकरांना 50 वर्षांच्या शिक्षेसाठी सेल्युलर जेलमध्ये पाठवले जात असताना बोटीवर थांबून त्यांच्या मनात ‘स्वतंत्र भारताचा सर्वोत्कृष्ट नाविक तळ अंदमान निकोबार येथे व्हावा’, असा विचार आला. आज भारताचा सर्वोत्कृष्ट नाविक तळ अंदमान निकोबार येथे आहे. हा त्यांच्या दूरदृष्टीचा दाखला आहे. केवळ समाजाचा विचार त्यांच्या मनात असे. राष्ट्रासाठी मरणे म्हणजे जगणे, असा त्यांचा विचार होता. अभिनव भारतच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना संघटित केले होते. अभिनव भारतचे तत्वज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी त्यांनी मर्सिलीस येथे बोटीतून उडी मारली असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

सावरकरांनी (Savarkar) तुरुंगातही साक्षरतेचे काम केले. सावरकर सेल्युलर जेलमध्ये जाताना जेलमधील साक्षरतेचे प्रमाण शून्य टक्के होते. सावरकर जेंव्हा जेलमधून बाहेर आले तेंव्हा तिथला साक्षरता दर 60 टक्के होता. चवदार तळ्याची चळवळ यशस्वी झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन प्रथम सावरकरांनी केले. हिंदू ही जगण्याची पद्धत आहे. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रदेशाला जो मातृ पितृ भूमी मानतो तो प्रत्येकजण हिंदू आहे, असे त्यांचे मत होते. सावरकरांबद्दल बोलताना वैचारिकता जागृत ठेऊन तर्कशुद्धपणे बोलायला हवे, असा सल्ला देखील सोमण यांनी दिला.

ॲड. हर्षदा पोरे यांनी सूत्रसंचालन, आभार व्यक्त केले. अश्विनी अनंतपुरे यांनी परिचय करून दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.