Pune : ‘वीर’ महानाट्याद्वारे उलगडणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनप्रवास

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच्या संघर्ष, त्याग आणि क्रांतीची यशोगाथा आता लवकरच नाट्यमय स्वरूपात रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. शिवलीला फिल्म्स निर्मित, आरोह वेलणकर दिग्दर्शित ‘वीर’ या सिनेमॅटिक स्टेज शोव्दारे विनायक दामोदर सावकरांचा जीवन प्रवास 30 एप्रिल पासून उलगडणार आहे.

नुकतीच ‘वीर’ नाटकाची पत्रकार परिषद  झाली. या पत्रकार परिषदेमध्ये वीर नाटकाच्या मोशन पोस्टरचे अनावरण झाले. वीर नाटकाच्या संकल्पने बद्दल सांगताना या नाट्यकृतीद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारा अभिनेता आरोह वेलणकर म्हणाला, “मी लहानपणापासून वीर सावकरांच्या संघर्षमयी प्रवासाचा आणि साहसी वृत्तीचा चाहता राहिलो आहे. त्यात दोन वर्षांपूर्वी मी अंदमानला गेलो असताना सावरकरांच्या तुरूंगवासाची साक्षीदार असलेली सेल्युलर जेल पाहायला गेलो. आणि त्यांच्या ओजस्वी व्यक्तिमत्वाचा ठसा तिथेही जाणवला. त्यानंतर सावरकरांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारे एक महानाट्य घेऊन येण्याची संकल्पना सुचली.“

वीर नाटकाचे निर्माते शिवम लोणारी यांचे हे पहिलेच नाटक आहे. यापूर्वी शिवलीला फिल्म्सव्दारे त्यांनी ‘बर्नी’, ‘चिनु’, ‘साम दाम दंड भेद’ आणि ‘गुलदस्ता’ अशा सिनेमांची निर्मिती केली आहे. नाट्यसृष्टीत निर्माता म्हणून पाऊल ठेवताना शिवम लोणारी म्हणाले, “वीर सावरकरांचा संपूर्ण जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आजच्या पिढीला त्यांचा प्रेरणादायी जीवनपट सांगणं गरजेचे आहे, असे आम्हांला वाटले.

वीर सावकरांवरच्या या महानाट्यात वाळू कलेपासून रेडियम पेंटिंगपर्यंत सुमारे 8 विविध कलाप्रकारांचा वापर करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुणे, लंडन, अंदमान आणि रत्नागिरीच्या वास्तव्यातल्या महत्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकलेला या नाट्यकृतीतून दाखवण्यात येणार आहे.

वीर सावरकरांच्या भूमिकेत फर्जंद सिनेमात काम केलेला अभिनेता निखील राऊत बरोवर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीलम पांचाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वीर नाटकाचा पहिला शो गणेश कलाक्रीडा रंगमंच, पूणे इथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.