Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ईएमएमआरसीच्या लिव्हिंग विथ ऑटिझम माहितीपटाला युजीसीचे पारितोषिक

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ईएमएमआरसी विभागाने तयार केलेल्या “लिव्हिन्ग विथ ऑटिझम” या माहितीपटाला यूजीसी-सीईसी या संस्थांनी घेतलेल्या एज्युकेशनल व्हिडिओ कॉम्पिटीशन या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ‘बेस्ट एज्युकेशनल प्रोग्राम ऑफ दि इयर’ या विभागात पारितोषिक प्राप्त झाले आहे.

यूजीसी-सीईसी एज्युकेशनल व्हिडिओ कॉम्पेटिशन ही स्पर्धा देशभरातील शैक्षणिक माहितीपटांकरिता घेतली जात असून यंदा स्पर्धेचे २३ वे वर्ष आहे. पारितोषिक मिळालेले सर्व माहितीपट गुजरात युनिव्हर्सिटी, अहमदाबाद येथे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखवले जाणार आहेत, अशी माहिती ईएमएमआरसीचे विभागप्रमुख डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी दिली.

या माहितीपटासाठी संकलन आणि दिग्दर्शन वसीम पठाण यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माता म्हणून विवेक नाबर यांनी काम पाहिले आहे. याची संकल्पना विज्ञान विभागाचे अधिष्ठाता आणि ईएमएमआरसी चे विभागप्रमुख डॉ. अरविंद शाळीग्राम यांची आहे. संहिता हर्ष काबरा यांनी लिहली आहे, तर तेजश्री पाटील यांनी निवेदन केले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी शिवराज चिंचवडे यांनी पार पाडली आहे. ग्राफिक्स साठी विनोद काळगी आणि अमृता घोडे यांनी काम केले आहे तर तंत्र सहाय्यक म्हणून सिलास काकडे, राम जाधव, सॅम्युएल गवळे, प्रदीप भोसले, तानाजी सुतार, सिल्वराज पिल्ले, फय्याज शेख यांनी काम केले आहे. या माहितीपटासाठी नेहा गद्रे, भुवनेश कुलकर्णी, दया इंगळे, सतीश इंगळे, नेत्रा तेंडुलकर यांचेही योगदान लाभले आहे.

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजेच ‘स्वमग्नता’ या संवेदनशील विषयावरील हा माहितीपट आहे. यात विविध तज्ञ आणि थेरपिस्ट विशेषतः डॉ. सुनील गोडबोले, डॉ. नंदिनी जोशी, डॉ. अर्चना कदम आणि डॉ. उर्जिता कुलकर्णी यांसारख्या तज्ञांनी आपली मते मांडली आहेत. ‘स्वमग्नता’ या विषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी आणि अश्या मुलांच्या पालकांनी खचून न जाता योग्य वेळेला आवश्यक ती थेरपी घेऊन यातून मार्ग काढावा हाच माहितीपटाचा उद्देश आहे.

जागतिक विक्रमवीर पृथ्वीराज इंगळे या विशेष मुलाची आतापर्यंतची यशस्वी वाटचाल या माहितीपटात दाखवली आहे. स्वतः स्वमग्न असून देखील पृथ्वीराजने सलग सहा तास गायनाच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.