Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला 10 कोटी रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोबर हॉल आणि अद्ययावत सिंथेटीक ट्रॅकच्या उद्घानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बालेवाडी परिसरात उत्तम क्रीडा सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातदेखील अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातल्या कुठल्याही भागात समाजाच्या हितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्माकरकासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल.

खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन देण्याची गरज – Savitribai Phule Pune University

पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे विद्यापीठ घडविण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा. आपल्या युवा पिढीत मोठी क्षमता आहे. खेळाडुंच्या क्षमतेला वाव देताना पायाभूत सुविधा निर्माण करून देत प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यापीठाला कुठलीही समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. खेळाडुंवर भार न टाकता क्रीडा संकुलाची देखभाल करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या बाबतीत आपलेपणाच्या भावनेने सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, प्रत्येक विद्यार्थी आपला असल्याची भावना अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी दाखवावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

ते पुढे म्हणाले , पै.खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून यशाची प्रेरणा सर्वांना दिली. देशाला कुस्तीतले पहिले कांस्य पदक मिळवून दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचार आणि कार्याने जगाला प्रभावीत केले. त्यांचे विद्यापीठात उभारण्यात आलेले पुतळे मानवतेसाठी कार्य करण्याची आणि यशाची प्रेरणा विद्यार्थ्यांना देतील असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग काही शहरात वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.

पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, जागतिक तापमान वाढीमुळे जगावर परिणाम होत असताना पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, ही काळाची गरज आहे. एक दिवस पर्यावरणाचा विचार न करता 365 दिवस आपल्यापरिने पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायला हवे.

सामंत म्हणाले, पुण्याच्या शैक्षणिक पंढरीत अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून पुण्याला देशपातळीवर लौकीक वाढविण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या विद्यार्थ्याला सक्षम करणारे शिक्षण विद्यापीठात मिळायला हवे यासाठी विद्यापीठ आणि शासनाला मिळून काम करावे लागेल. काश्मिरी पंडीतांच्या मुलांना शिक्षणासाठी राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी 13 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्याात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा संकुलाच्या जलतरण तलाव आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक उभारण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune Plogathon 2022: पुणे प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह मोहिमेत 1 लाख 36 हजार 294 नागरिकांचा यशस्वी सहभाग

कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत अनेक बहुमान प्राप्त केले. विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय सामंज्यस्य करार करून आपला विस्तार केला आहे. देशपातळीवर विद्यापीठ 18 व्या स्थानी आहे. 27 एकर मध्ये उभारलेल्या क्रीडा संकुलामुळे क्रीडा क्षेत्रात विद्यापीठाचा नावलौकीक देशपातळीवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रीडा संकुलाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी विद्यापीठ लवकरच धोरण ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी पवार आणि सामंत यांनी स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनी यावेळी सिंथेटिक पथ, व्यायामशाळा आणि शुटींग रेंजची पाहणी करुन माहिती घेतली. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळ दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मल्लखांबच्या खेळाडूंनी मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. मंत्रीद्वयांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

अशा आहेत विद्यापीठातील नव्या क्रीडा सुविधा

क्रीडा संकुलामध्ये बहुउद्देशीय क्रीडा प्रकारांसाठी इनडोअर सभागृह तयार करण्यात आला आहे. यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत.

क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक व पॅव्हेलियन इमारत तयार करण्यात आली आहे. त्याच्या मध्यभागी फुटबॉल क्रीडांगण तयार करण्यात आले असून यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत रुपये 4 कोटीचे अनुदान प्राप्त झाले व उर्वरित खर्च विद्यापीठाने केला आहे. या अद्ययावत सिंथेटिक पथचा खेळाडूंना लाभ होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.