Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे चित्र लावावे – सत्यशीलराजे

एमपीसी न्यूज – शिक्षणाच्या प्रसारासाठी श्रावण महिन्यात देशभरातील विद्वान ब्राह्मणांना आमंत्रित करून दक्षिणा देण्याची ‘रमणा’ परंपरा सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी 1720 मध्ये सुरू केली. पुण्यात शिक्षणाचे मूळ आश्रयदाते असलेल्या खंडेराव दाभाडे यांचे चित्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सन्मानपूर्वक लावण्यात यावे, अशी मागणी दाभाडे राजघराण्यातील वंशज सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य अभिषेक बोके यांच्याशी सत्यशीलराजे दाभाडे यांनी यासंदर्भात चर्चा केली. विद्यापीठात खंडेराव दाभाडे यांचे चित्र नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ही त्रुटी पूर्ण करण्याची मागणी करणारे निवेदनही आवश्यक पुराव्यांसह त्यांना दिले. या संदर्भात विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे चित्र सन्मानाने लावण्याचे आश्वासन बोके यांनी यावेळी दिले.

या संदर्भात अधिक माहिती देताना सत्यशीलराजे म्हणाले, पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी 1720 मध्ये तळेगाव दाभाडे येथे सुरू केली.  शिक्षणाच्या प्रसारासाठी श्रावण महिन्यात देशभरातील विद्वान ब्राह्मणांना आमंत्रित करून दक्षिणा देत असत. याला ‘रमणा’ असेही म्हटले जात असे.

सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे 27 सप्टेंबर 1729 रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे थोरले पुत्र सरसेनापती त्रिंबकराव दाभाडे यांनी ही रमणा पद्धत पुढे चालू ठेवली. उभईच्या युद्धात त्रिंबकराव यांचा मृत्यू झाल्यानंतर उमाबाईसाहेब विधवा व मुले लहान असल्याने ही प्रथा खंडित झाली. त्यानंतर पेशव्यांनी पुण्यात रमणा पद्धत सुरू केली. ती पेशव्यांमार्फत 1818 पर्यंत चालू होती, अशी माहिती सत्यशीलराजे यांनी दिली.

ब्रिटीश राजवटीत पुण्यात अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. देशातील सर्वांत जुन्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेली डेक्कन कॉलेज ही संस्था देखील दक्षिणा म्हणजेच रमणा पद्धतीतून उभी राहिली आहे. या परंपरेचे जनक म्हणून सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्याचा योग्य तो सन्मान विद्यापीठाने ठेवला पाहिजे, अशी अपेक्षा सत्यशीलराजे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.