Pune News : सॉरी पप्पा म्हणत आत्महत्येसाठी निघाली तरुणी… पण

शोध घेऊन पोलिसांकडून मतपरिवर्तन

एमपीसी न्यूज : नोकरी नसल्याच्या नैराश्यातून फेसबुकवर सॉरी पप्पा… मी आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकत घरातून बेपत्ता झालेल्या एका 30 वर्षीय तरुणीचा शोध घेऊन पोलिसांनी तिचे मतपरिवर्तन करत आत्महत्येपासून परावृत्त केले. महिला सहाय्य कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे त्यानिमित्ताने कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी 30 वर्षाची आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरात राहते. लॉकडाऊनमध्ये तिची नोकरी गेली. परत मिळत नव्हती. यामुळे ती नैराश्यात गेली होती. या नैराश्यातुनच तिने फेसबुकवर आत्महत्या करणार असल्याबद्दल पोस्ट लिहिली. ती पोस्ट गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह यांना मिळाली.

त्यांनी तातडीने याची दखल घेत महिला  सहाय्यक कक्षाच्या सहायक निरीक्षक सुजाता शानमे यांना सांगितले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. तसेच हा सर्व प्रकार त्यांनी दामिनी पथकाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर दामिनी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

फेसबुकवरील माहितीच्या आधारे या तरूणीचा मोबाईल नंबर व राहत्या घराचा पत्ता पोलिसांनी मिळवला. पण तो बंद लागत होता. मग दामिनी पथकाच्या मार्शलने या तरुणीच्या घराच्या पत्त्यावर धाव घेऊन तिच्या आई-वडिलांना याबाबत कल्पना दिली असता त्यांनी ती सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयाकडून सदर तरुणीच्या मित्र-मैत्रिणीचे मोबाईल नंबर घेत त्यांना फोन केला.

त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी एका मित्राने ती याच परिसरात असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस व मित्रांनी कोथरुड भागात तिचा शोध घेतला. त्यावेळी ती एका मॉलच्या बाहेर बसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिला धीर देत कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. तसेच तिचे मत परिवर्तन केले. तिला धीर देऊन वडिलांसोबत घरी पाठवले. आता पोलीस तिला नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.