Corona Pimpri Update: शहरवासियांनो सावधान! केवळ आठ दिवसांत 225 नवीन रुग्ण

Scary situation in pimpri-chinchwad 225 new corona patients found within 8 days

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडकरांच्या चिंतेत भर पाडणारी बातमी आहे. दोन महिन्यात शहारातील रुग्णसंख्या 200 वर होती. पण, मागील अवघ्या आठ दिवसांत शहरात तब्बल 225 नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीतील 150 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे औद्योगिक नगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 78 दिवसांत चारशेचा आकडा पार केला आहे. दि. 10 मार्च ते दि. 26 मे या 78 दिवसात आज (दि. 26) सायंकाळी पाचपर्यंत शहरातील 424 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 242 सक्रिय रुग्णांवर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 175 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहराला रेडझोनमधून वगळल्यापासून नागरिकांची वर्दळ वाढली आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. दि. 10 मार्च रोजी एकाच दिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. बघता बघता कोरोनाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला विळखा घातला. दि. 10 मार्च ते दि. 18 मे पर्यंत शहरातील रुग्ण संख्या 200 वर पोहोचली होती.

त्यानंतरच्या आठ दिवसात तर कोरोनाने शहरात कहर केला. दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यातच दि. 22 मार्चपासून शहराला रेडझोनमधून वगळण्यात आले. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत दुकाने सुरु करण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली. परंतु, निर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली आहे.

मागील तीन दिवसांपासून दिवसाला 40 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. परिणामी, मागील आठ दिवसात शहरात तब्बल 224 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवार ते मंगळवार या चारच दिवसात 124 नवीन रुग्णांची भर पडली आहे. दि. 18 ते दि. 26 मे दरम्यान शहरातील रुग्ण संख्येत 224 ने वाढ झाली आहे. यामुळे शहरातील रुग्ण संख्या 424 वर जावून पोहचली आहे. ही पिंपरी-चिंचवडकरांच्या काळजाचा ठोका चुकविणारी आकडेवारी आहे.

सुरुवातीला सोसायटीत आढळलेला कोरोना मध्यमवर्गीय वस्तीतून झोपडपट्टीत शिरला आहे. शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या चिंचवड स्टेशन येथील आंनदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. दीडशेहून अधिक रुग्ण झोपडपट्टीत सापडले आहेत. त्याचबरोबर शहराच्या नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरील डोकेदुखी वाढली आहे. त्यातच शहरातील निर्बंध शिथिल करत जनजीवन सुरू केल्याने नागरिकांची बाहेर वर्दळ वाढली आहे. आजपासून पीएमपीएल बससेवाही सुरु झाली आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण !
महापालिकेच्या आठही प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. पिंपरीगाव, खराळवाडी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोहननगर, चिंचवडमधील पिंपळेगुरव, सौदागर, निलख, जुनी, नवी सांगवी, वाकड, पुनावळे, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, किवळे-विकासनगर, रावेत, आणि भोसरीतील भोसरी, दिघी, मोशी, चऱ्होली, रुपीनगर, चिखली, संभाजीनगर अशा शहराच्या जवळपास अशा संपूर्ण भागात आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. केवळ चिंचवडगाव, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर, निगडी गावठाण अशा काही भागात रुग्ण सापडले नाहीत. ही दिलासादायक बाब मानली जात आहेत.

शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न

”पिंपरी-चिंचवड शहराला राज्य सरकारने रेडझोनमधून बाहेर काढत नॉन रेडझोन आणले आहे. महापालिका शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. सध्या एकाच कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. आठ दिवसात वाढलेल्या 224 रुग्णांपैकी 150 रुग्ण फक्त आनंदनगर झोपडपट्टीतील आहेत. त्यामुळे तो पुर्ण झोन कंटेन्मेट केला आहे. जास्त क्षमतेने चाचण्या करत आहोत. त्यामुळे आनंदनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडून आले आहेत. त्यातील 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. भविष्यात जशी परिस्थिती निर्माण होईल. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल.

कंटेन्मेंट झोन घोषित करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास शहरातील मोठे क्षेत्रही कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करु शकतो. सध्या एकाच कंटेन्मेंटमधून रुग्ण वाढत आहेत. ज्यावेळी गरज पडेल. त्यावेळी कंटेन्मेंट वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल”, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.