School in Pimpri Chinchwad : पालकांची लूट करणाऱ्या शाळेवर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी – राहुल कोल्हटकर

एमपीसी न्यूज : आजपासून प्राथमिक शाळेला (School in Pimpri Chinchwad) प्रारंभ झाला. कोरोना काळात थांबलेली शाळेची गाडी दोन वर्षांनी पुन्हा रुळावर आली. या दरम्यान पालकांची सुरू असणारी लूट याकडे लक्ष वेधत राहुल रूपराव कोल्हटकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे.

शालेय साहित्य खरेदी करायची झाल्यास काही ठराविक विक्रेत्यांकडूनच घ्या, असे सांगून काही शाळा पालकांवर दबाव आणत आहेत. तरी, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांची तपासणी करून शासन निर्णय (20040726132812001-0500, 11 जून 2004) न पाळणाऱ्या शाळांवर शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोना काळात बंद असलेल्या शाळा दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत. १४ जून पासून बहुतेक शाळा सुरू झाल्या असल्याने पाल्य उत्साहात आणि पालक शालेय साहित्याच्या खरेदीत व्यग्र आहेत. मात्र, अनेक खासगी शाळांनी पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य शाळेने सांगितलेल्या ठरावीक दुकानांतूनच खरेदी करावे, अशी सक्ती केली आहे. दुसरीकडे हेच साहित्य वाजवी दरात मिळत असताना शाळेचा विशिष्ट दुकानांसाठी आग्रह का? असा सवाल पालक करत आहेत.

कोरोना काळात ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे अनेक पालकांना हा अधिकचा खर्च सोसणे कठीण होत आहे. कोरोना काळात अनेक शाळांनी स्वत:चा वेगळा अभ्यासक्रम सुरू केला असल्याने एखाद्या विशिष्ट प्रकाशनाचीच पाठ्यपुस्तके आणि साहित्याची गरज निर्माण केली आहे. यामुळे शाळा, शैक्षणिक साहित्य विक्रेते आणि प्रकाशने यांचे साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, शाळांनी दिलेल्या पास किंवा चिठ्ठीनुसार त्या दुकानात गेल्यावर पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तकांचा एक संपूर्ण संच देतात. त्यातील अनेक पुस्तकांची गरजही नाही असे प्रत्यक्षात पाहिले असता जाणवते. पण, नाईलाज असल्यामुळे पालकांना त्यांची खरेदी करावी लागते.

शासन निर्णय 2004 नुसार कोणत्याही शाळेला एखाद्या विशिष्ट, ठरावीक विक्रेत्याकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करा, अशी सक्ती पालकांवर करता येत नाही. परंतु, शाळा व्यवस्थापनाने हे नियम धाब्यावर बसविले आहेत. सर्व खासगी शाळांत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अनेक गरीब मुले दाखल होतात. त्यांना केवळ शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. पण, पुस्तके आणि शाळेचे इतर साहित्य खरेदीसाठी सक्ती केल्याने मुलांच्या पालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवते. सध्या अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने अनेक पालक कर्ज काढून, वस्तू गहाण ठेवून, उधार उसनवारीवर पैसे घेऊन हे शैक्षणिक साहित्य खरेदी करत आहेत. शाळांनी ठरवून दिलेले विक्रेते बाजारभावापेक्षा जास्त दर आकारतात, तसेच शाळा व विक्रेते यांच्यात काही करार किंवा टक्केवारी ठरली असल्याने शाळा ही अधिकाधिक नफा मिळण्यासाठी तेथूनच खरेदी करण्याच्या सक्तीचे आदेश काढल्याने पालकांचा नाइलाज होतो. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा (School in Pimpri Chinchwad) यात अग्रेसर आहेत.

Charholi News: प्रस्तावित 90 मीटर रस्त्याची ‘अलाइनमेंट’ बदला, लघुद्योजकांची महापालिकेकडे मागणी

शाळांना अशी सक्ती करता येऊ शकत नाही. पुस्तके कुठून घ्यावीत? हा पालकांचा प्रश्न आहे. शाळेने अशी सक्ती केल्यास पालकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्या असा शिक्षण विभाग यांचा आदेश आहे. पण, आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून पालक तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात. म्हणूनच निवेदनाच्या माध्यमातून राहूल यांनी पालकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.

पालकांची शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली लूट करून पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अनुदानित विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित , सीबीएससी, आयसीएससी अशा सर्व शाळांची तपासणी करावी. तसेच, कोणत्या शाळेत जर अशा प्रकारचे गैरकारभार तसेच शासन आदेशाचे पालन होत नसेल तर शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर अशासकीय खाजगी शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबतच्या शासन निर्णयानुसार देण्यात सूचनाप्रमाणे त्वरित कारवाई करावी. जेणेकरून आपली समस्या मांडू न शकणाऱ्या अथवा दबावाखाली लूट सहन करणाऱ्या पालकांची (School in Pimpri Chinchwad) समस्या सुटेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.