School News: यावर्षी एप्रिलमध्येही शाळा राहणार सुरू, उन्हाळ्याची सुट्टी फक्त मे महिन्यात?

शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी सुट्टी ऐवजी ऐच्छिक शाळा?

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग एप्रिलपर्यंत पूर्णवेळ आणि शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्याचे आदेश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने काल (गुरुवारी) दिले. दर शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  

कोरोनाच्या संसर्गामुळे यावर्षी राज्यातील शाळा ऑक्टोबरपासून ऑफलाईन सुरू झाल्या. आता करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने एप्रिलमध्येही शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील शासकीय आदेश जारी केला आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यास परवानगी दिली जाते. यंदा मार्चपासून एप्रिलअखेपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात करण्याऐवजी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. एप्रिलअखेपर्यंत शाळा शनिवारी पूर्णवेळ, रविवारी ऐच्छिक स्वरूपात सुरू ठेवता येईल. पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेऊन निकाल मेमध्ये जाहीर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

एक मार्चपासून शाळा सकाळी सुरू होतात, हे शिक्षण विभागाला माहीत असूनही मार्च अखेरीस हा आदेश जारी करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बहुतांश शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत तर काही शाळांच्या परीक्षा संपल्या संपल्या देखील आहेत. अनेक पालकांनी सुटीत परगावी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही करून ठेवले आहे. मे महिन्यातील कामाबाबत आदेशात काहीही स्पष्ट करण्यात आले नसल्याने त्याबाबत शिक्षकांवर्गात संभ्रम दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.