Pimpri : गटनेत्यांची ‘शाळा’; राष्ट्रवादी, शिवसेना शिक्षण समितीचे सदस्य शहरात अन्‌ गटनेते दिल्लीत!

आयुक्त तातडीने दिल्लीला रवाना 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याकरिता शिक्षण समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय दिल्ली दौ-याचे नियोजन केले. परंतु, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेच्या एक असे चार सदस्य दौ-यावर गेले नाहीत. त्यांना ऐनवेळी माहिती देण्यात आली. तर, गटनेते दौ-यावर गेले आहेत. त्यामुळे समितीचे सदस्य शहरात अन्‌ गटनेते दिल्लीत अशी विरोधी भूमिका समोर आली आहे. गटनेत्यांना कोणती भूमिका आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर, आयुक्त श्रावण हर्डीकर आज (सोमवारी) तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. 

महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी दिल्लीतील केजरीवाल सरकारने सुधारणा केलेल्या शाळांची पाहणी दौरा करण्याची संकल्पना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडली. शिक्षण समितीच्या सदस्यांसाठी या दौ-याचे नियोजन केले होते. त्यानंतर तातडीने त्याची अंमलबजावणी करत रविवारी (दि.7) महापौर राहूल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, समितीच्या भाजपच्या सदस्या शारदा सोनवणे, सुवर्णा बुर्डे, नगरसेवक प्रमोद कुटे, शाम लांडे, नवनाथ जगताप, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे दिल्लीला रवाना झाले.  तर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिल्लीकडे ‘टेकऑफ’ केले आहे.

तथापि, विरोधी पक्षातील समितीतील सदस्यांना दौ-याची ऐनवेळी माहिती देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे समितीतील सदस्य राजू बनसोडे, विनया तापकीर, उषा काळे आणि शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे दौ-याला गेल्या नाहीत. तर, सत्ताधारी पक्षाच्या देखील एक नगरसेविका दौ-याला गेल्या नाहीत. समितीचे केवळ चार सदस्य आणि नगरसेवक दौ-याला गेले आहेत. स्वपक्षाचे नगरसेवक दौ-यात सहभागी झाले नसताना गटनेते सहभागी झाल्याचे विरोधी चित्र समोर आले आहे. त्यामुळे गटनेत्यांना पक्षाची कोणती भूमिका आहे की? नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच गटनेत्यांच्या भूमिकेविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

शिवसेनेच्या सदस्या अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, शिक्षण समितीचे सदस्य असूनही आम्हाला दौ-याची माहिती देण्यात आली नाही. याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीच्या विनया तापकीर म्हणाल्या, दौ-याची ऐनवेळी माहिती दिली. त्यामुळे जाणे अशक्य झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.