School Reopen in Maharashtra : शाळेत पुन्हा किलबिलाट! 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार

एमपीसी न्यूज – कोरोना लाटेचा काहीसा प्रभाव कमी झाल्याने राज्यशासनाने अनेक गोष्टींबाबत सामान्यांना दिलासा देत जनजीवन पुन्हा सुरळीत केले आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे शाळेपासून दुरावलेल्या चिमुकल्यांसाठी सरकारने आज महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असून आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.

लहान मुलांचे लसीकरण आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा सुरू करायच्या की नाहीत याबाबत संभ्रम कायम होता. शाळा सुरू करण्याबाबत राज्याच्या टास्क फोर्सने यापूर्वीच संमती दर्शवली होती, परंतु या निर्णयाबाबत राज्य सरकार आज काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

दरम्यान, यावर सकारत्मकतेने विचार करत अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. याआधी राज्यात चौथी ते सातवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सने शाळा शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यासंबंधी याआधी परवानगी दिली असली तरीही सर्व गोष्टींची पुर्तता केल्यानंतरच निर्णय घेण्यात यावा असे टास्क फोर्सकडून राज्य शासनाला सुचवण्यात आले होते. आज या सर्वच गोष्टींबाबत शाहानिशा करून मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आहे.

मार्गदर्शक सूचना तयार करणार – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

या निर्णयाबाबत माध्यमांशी बोलताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबंधी टास्क फोर्ससोबत चर्चा करून मार्गदर्शक सूचना तयार करणार असल्याचे सांगितले. गायकवाड म्हणाल्या, शाळा सुरू होण्याआधी तयारीसाठी आठ दिवसांचा वेळ घेण्यात आला आहे. शिवाय उद्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून मागच्या वेळेस शाळे सुरू करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना सविस्तर आहेत. त्यानुसार पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.