Pimpri : पालिकेच्या शाळा होणार स्मार्ट; ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची संकल्पना

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत प्रायोगिक तत्वावर सहा शाळांमध्ये उपक्रम  

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. 40 कोटी निधी खर्च करुन त्याअंतर्गत अत्याधुनिक सेवा-सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर चार प्राथमिक आणि दोन माध्यमिक अशा सहा शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच एरिया बेस डेव्हल्पमेंट (एबीडी) अंतर्गत शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. याशिवाय शहराच्या उर्वरित भागात ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या आज (शनिवारी)झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

 

पालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व पीसीएससीएलचे अध्यक्ष डॉ. नितीन करिर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची बैठक झाली. स्मार्ट सिटीचे संचालक केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर.एस.सिंग, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, स्मार्ट सिटीचे सहमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, निळकंठ पोमण, स्मार्ट सिटीचे वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे  बैठकीला उपस्थित होते. तर, महापौर राहुल जाधव, पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन आणि विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर गैरहजर होते.

त्यानंतर पत्रकारांना बैठकीतील माहिती देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या सहा शाळांमध्ये  ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपळेगुरव येथील 54 नंबरची शाळा, चिखली म्हेत्रे वस्तीतील शाळा, सांगवीतील पी.एच. होळकर मुलांची शाळा क्रमांक 49 आणि पिंपळेसौदागर येथील 51 नंबरची या चार प्राथमिक शाळा तसेच पिंपळे गुरव, पिंपळेसौदागर येथील दोन माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये इंग्रजी विषयाची प्रयोगशाळा, रोबेटिक प्रयोगशाळा असणार आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच यासाठी चार कोटीवरुन 40 कोटी निधीची तरतूद केली आहे.

एरिया बेस डेव्हल्पमेंट (एबीडी) अंतर्गत शहरात सर्वत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये सार्वजनिक, स्ट्रीट, लॉंच या  तीन प्रकारच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे.  तसेच बीआरटी रोडवर देखील स्वच्छतागृह बांधले जाणार आहेत. शहराच्या उर्वरित भागात ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम राबविण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त सायकल ट्रक बांधण्यात येणार आहेत.  नागरिकांच्या सूचनांचा विचार करुन शहराच्या उर्वरित भागात दोन महिन्यात ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात सौरउर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे.

नवउद्योजकांना चालना देण्यासाठी ‘इन्क्युबेटर सेंटर’ उभारण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्ष प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा खर्च ‘स्टार्ट अप’ योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे. तसेच आकृती बंधाला देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुढील आठवड्यात 400 कोटीच्या कामाची निविदा काढली जाणार असल्याचेही, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.