Pimpri news : दिवाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा सुरु होणार, 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग भरणार

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची  संमती घेणे बंधनकारक

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉकमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत  राज्य सरकार शाळा सुरु करणार आहे. दिवाळीनंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेणे बंधनकारक आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता, सुरक्षाविषयक दक्षता घेण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी व शिक्षणाच्या स्वरूपाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. परंतु, प्रत्यक्षात शाळा, महाविद्यालये सुरु नाहीत.

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत  सर्व आस्थापना टप्या-टप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. राज्यात विविध प्रकारचे उपक्रम सुरु करण्यासाठी महसूल व वन विनागाने  सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचनांनुसार शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम सुरु करण्यासाठी सहमती दिली आहे. त्यानुसार 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. तसेच नववी ते बारावीचे वसतिगृह, आश्रमशाळा विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह  सुरु करण्यास मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेणे बंधनकारक आहे.

‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना!
शाळेत स्वच्छता व निर्जुंतीकरण विषय सुविधा सुनिश्चित करणे: –
#हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे
#थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, गण, ऑक्सीमीटर, जंतूनाशक, साबण, पाणी
#शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण सुनिश्चित करावे.
# एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते स्थलांतरित करावे. हस्तांतरण करण्यापूर्वी शाळेचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.
# क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.
शिक्षकांची कोविड-19 बाबतची चाचणी:-
# शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी 12 ते 22 नोव्हेंबर दरम्यान कोविडची चाचणी करणे बंधनकारक असेल. चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे.
# चाचणी पॉझिटीव्ह आल्यास शिक्षकांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित रहावे. निगेटीव्ह रिपोर्ट असलेल्या शिक्षकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करावी.

# विशिष्ट जबाबदा-यांसहित विविध कार्यगट गठित करावे. आपत्कालीन गट, स्वच्छता पर्यवेक्षण गट, त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांचा समावेश करावा

बैठक व्यवस्था: –
#वर्गखोली, स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार असावी.
# वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.

शारीरिक अंतर नियमांच्या अंमलबजावणीकरिता चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे: –

#शाळेत दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्कचा वापराबाबत मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर प्रदर्शित करावेत.
#थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
# शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फुट इतके शारीरिक अंतर राखावे.
# पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुणे, स्वच्छतागृह येथे चौकोन, वर्तुळ करावे.
# सुरक्षित अंतराकरिता येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणा-या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात.
शाळेतील कार्यक्रम आयोजनावर निर्बंध:-
# परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा यासह इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होवू शकते. अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात.

पालकांची संमती:-
# विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमत आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी.
# आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये.
# विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ट योजना, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी तयार करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.