Pimpri : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद – मुख्यमंत्री ठाकरे

एमपीसी न्यूज –  दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता पुणे, पिंपरी-चिंचवड मधील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, नाट्यगृहे बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी (दि. 13) रात्री बारापासून पुढील सूचना मिळेपर्यंत करण्यात येणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता शाळा बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत सांगितले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, नाट्यगृहे बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच कर्मचा-यांना शक्य तेवढे घर काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) संबंधितांनी मुभा द्यावी, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आदी शहरातील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, नाट्यगृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमेरिका येथून भारतात (पुण्यात) आलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बांधितांची संख्या 10 झाली आहे. तर राज्यात हा आकडा 17 वर पोहोचला आहे. नागपूर येथे दोन रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन याबाबत योग्य ती खबरदारी घेत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खबरदारीसाठी पिंपरी-चिंचवडमधील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. कर्मचा-यांनी शक्य तेवढे घरून काम करावे. त्यासाठी संबंधितांनी कर्मचा-यांना मुभा द्यावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच प्रवास करावा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

संबंधित ठळक बातम्या

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.